सोलापूर : माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी येथे ईव्हीएम यंत्रावर शंका उपस्थित करून मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान घेण्याची गावकऱ्यांनी केलेली तयारी आणि त्यास निवडणूक यंत्रणेने कायदेशीर कारवाईचा इशारा देत चाचणी मतदान रोखण्याच्या पार्श्वभूमीवर मारकडवाडीची चर्चा देशभर गाजत आहे. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः मारकडवाडीला भेट देऊन गावकऱ्यांशी साधलेल्या संवादानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सायंकाळी तातडीने एका पत्रकार परिषदेत ईव्हीएम यंत्र प्रणालीसह अन्य मुद्यांचे स्पष्ट शब्दात खंडन केले. कोणत्याही निवडणुकीचे मतदान घेण्याची अधिकार निवडणूक आयोगाला असून अन्य कोणालाही नाही. मारकडवाडीत गावकऱ्यांनी स्वतःच्या समाधानासाठी चाचणी मतदान घेण्याची घेतलेली भूमिका पूर्णतः बेकायदेशीर होती. यातून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे मत जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केले.
माळशिरससह अन्य सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये ईव्हीएम प्रणाली द्वारे राबविलेली मतदान प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक असून त्यात प्रत्येक टप्प्यावर संबंधित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सामावून घेण्यात आले होते. प्रत्येक टप्प्यात याबाबत कोणीही आक्षेप घेतला नाही. परंतु, आता शेवटी असा आक्षेप घेऊन निवडणूक आयोगाच्या संदर्भात अविश्वासाचे वातावरण निर्माण करणे चुकीचे आहे, असे कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : Aamshya Padavi : VIDEO : आमदारकीची शपथ घेताना गोंधळ का झाला? आमश्या पाडवी यांनी स्वत:च सांगितलं कारण
ईव्हीएम प्रणाली राबविण्यात पूर्वी १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान पहिल्या स्तरावर ईव्हीएम यंत्र तपासणी केली गेली. तेव्हापासून ते मतमोजणीपर्यंतच्या सर्व टप्प्यांवर प्रक्रिया राबवताना साक्षीदार म्हणून संबंधित राजकीय पक्षांचे प्रतिनिधी हजर होते. ईव्हीएम यंत्र गोदामात स्ट्रॉंगरूममध्ये ठेवल्यानंतर मतमोजणी होईपर्यंत तेथे अहोरात्र सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत होते. सीसीटीव्ही फुटेज कोणत्याही क्षणी संबंधित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना पाहण्याची आणि योग्य खात्री करून घेण्याची मुभा होती. यात प्रत्येक स्तरावर पारदर्शकता असताना त्याबद्दल आता पुरावे न देताच आक्षेप घेतले जात आहेत. त्यामुळे निवडणूक यंत्रणाविषयी समाजात विनाकारण संभ्रम निर्माण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.