सोलापूर : गेले सात महिने रिक्त असलेल्या सोलापूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्षपदावर अखेर सातलिंग अण्णाराव शटगार यांची वर्णी लागली आहे. याशिवाय प्रदेश उपाध्यक्षपदी ॲड. रामहरी रूपनवर, तर सरचिटणीसपदी माजी महापौर अलका राठोड आणि माजी नगरसेवक विनोद भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाची जिल्ह्यातील अवस्था अतिशय दयनीय असून, या अवस्थेत पक्षबांधणीचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली जाहीर झालेल्या पक्षाच्या नव्या कार्यकारिणीमध्ये ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांची प्रदेश राजकीय व्यवहार समितीसह कार्यकारी समितीवर निवड झाली आहे.

जिल्हाध्यक्षपद गेल्या सात महिन्यांपासून रिक्तच होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांच्याशी वाद झाल्याने तत्कालीन जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता.

नूतन जिल्हाध्यक्ष शटगार हे वीरशैव लिंगायत समाजातून आणि अक्कलकोट भागातून आले आहेत. ते निवृत्त शिक्षक आहेत. मात्र जिल्ह्यात अस्तित्वासाठी लढणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या बांधणीचे आव्हान विशेषतः सोलापूर लोकसभा मतदारसंघात खासदार प्रणिती शिंदे या प्रतिनिधित्व करीत असल्या, तरी प्रत्यक्षात पक्षाची अवस्था अतिशय दयनीय आहे. सोलापूर लोकसभा क्षेत्रात एकूण सहापैकी एकही आमदार काँग्रेसचा नाही. यात अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, पंढरपूर-मंगळवेढा, मोहोळ या चार विधानसभांसह जिल्ह्यातील करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस, बार्शी या भागात तर पक्षाची केविलवाणी अवस्था आहे. येथे कोणीही बडा नेता उरला नाही.

दुसरीकडे अक्कलकोट, दक्षिण सोलापूर हे दोन हक्काचे विधानसभा मतदारसंघ काँग्रेसने दहा वर्षांपूर्वीच गमावले आहेत. त्यात अक्कलकोटमध्ये माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे अलीकडेच काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश करते झाले आहेत, तर दक्षिण सोलापूर तालुक्यात माजी आमदार दिलीप मानेही काँग्रेसपासून दूर अंतरावर आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी महापौर अलका राठोड आणि सनदी लेखापाल विनोद भोसले यांची प्रदेश सरचिटणीसपदी वर्णी लागली आहे. राठोड या बंजारा, तर भोसले हे मराठा समाजाचे आहेत. प्रदेश उपाध्यक्षपदी धनगर समाजाचे ॲड. रामहरी रूपनवर (माळशिरस) यांना कायम करण्यात आले आहे. परंतु त्यांचा स्थानिक पातळीवर पक्षाच्या बांधणीच्या दृष्टीने अपेक्षित जनसंपर्क दिसत नाही. त्यांना पूर्वी काँग्रेसने विधान परिषदेवर सामावून घेतले होते. ॲड. रूपनवर हे पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते आहेत.