सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी शहरात माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्याशी संबंधित बालाजी चित्रमंदिराचा परवाना पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी अपिलात रद्द करून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवला आहे.
बालाजी चित्रमंदिराच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर जुगार अड्डा चालविला जात होता. तेथे पोलिसांनी दोनवेळा छापे टाकून कारवाई केली होती, असा आक्षेप घेऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या चित्रपटगृहाचा परवाना रद्द केला होता. त्याविरूद्ध सिध्दाराम म्हेत्रे यांचे बंधू शंकर म्हेत्रे यांनी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे अपील दाखल केले होते. परंतु हे अपील फेटाळून लावण्यात आले.
शंकर म्हेत्रे यांनी अपिलात म्हटले होते की, बालाजी चित्रमंदिराचा परवाना रद्द करण्यात आल्यामुळे त्यावर अवलंबून असलेले २० कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुधनी व २५ किलोमीटर परिसरात इतर कोणतेही मनोरंजनाचे साधन नाही. तसेच चित्रपटगृहाचा परवाना रद्द करण्याची कारवाई केवळ राजकीय द्वेषभावनेपोटी करण्यात आली आहे, असा आरोपही म्हेत्रे यांनी केला होता.
तथापि, यासंदर्भात जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने यात गंभीर आरोप होता. अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी सादर केलेल्या अहवालानुसार दुधनी येथे बालाजी चित्र मंदिराच्या वरच्या मजल्यावर जुगार अड्डा सुरू होता. २०२१ साली तेथे सलग दोनवेळा घातलेल्या धाडीत जुगार अड्डा सुरू होता. त्यावर झालेल्या कारवाईत लाखोंची रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले होते. पोलिसांची कारवाई चुकविण्यासाठी संशयितांना चित्रपटगृहाचे तिकीट देऊन त्यांना लपविण्याच्या हेतूने चित्रपटगृहाचा परवाना नियमित सुरू करण्याचा दावा करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने म्हटले आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून विभागीय आयुक्तांनी अपील फेटाळून लावले.
माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी अलिकडेच काँग्रेस पक्ष सोडून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला आहे. त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी हे मानले जातात.