सोलापूर : शासनाच्या कामगार विभागातर्फे नोंदणीकृत बांधकाम मजुरांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातो. यात एखाद्या बांधकाम मजुराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना दोन लाख रुपयांचे अर्थसाह्य दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सोलापुरातील काही जणांनी मजुरांचा बनावट मृत्यू दाखला सादर केला आणि त्या आधारे दोन लाखांचे अर्थसाह्य घेतल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी पाच बांधकाम कामगारांच्या वारसदारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत संतोषकुमार ज्ञानोबासिंह राजपूत (रा. अंबाजोगाई) या दुकान निरीक्षकाने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यापैकी तीन जणांनी शासनाच्या बांधकाम कल्याण योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांची शासनाची फसवणूक केल्याचे आढळून आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसदारांना दोन लाखांचे अर्थसाह्य दिले जाते. परंतु योजनेचा गैरलाभ घेण्यासाठी काही जण बांधकाम मजुरांच्या नावाने बनावट मृत्यू दाखले बनवून त्या आधारे लाभ उकळल्याच्या तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार शासनाच्या कामगार विभागाच्या प्रधान सचिवांनी दिलेल्या आदेशानुसार, राज्यातील सर्व जिल्ह्यांत लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी पथके नियुक्त केली आहेत. सोलापूर जिल्ह्यासाठी कोल्हापूरचे सहायक कामगार आयुक्त विशाल घोडके यांच्या अधिपत्याखालील पथकाने लाभार्थ्यांची पडताळणी केली असता, यात एकूण पाच बांधकाम मजुरांच्या नावे बनावट मृत्यू दाखला तयार करण्यात आल्याचे आणि त्यांपैकी तीन बांधकाम मजुरांच्या वारसांनी प्रत्येकी दोन लाखांचे अर्थसाह्य उकळल्याचे दिसून आले. शासनाची फसवणूक केल्याच्या कृत्यात चार महिलांचा समावेश आहे. यात कोणालाही अटक झाली नाही.