सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गेल्या १३ दिवसांपासून मान्सूनपूर्व दमदार पावसाची हजेरी लागत असून आतापर्यंत एकूण सरासरीपेक्षा तब्बल सातपटांपर्यंत पाऊस झाला आहे. हा पाऊस विशेषतः जिल्ह्यातील पूर्व भागात म्हणजे माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला आदी तालुक्यांत तुलनेने मोठ्या प्रमाणात होत आहे.

सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात माळशिरस आणि करमाळ्याचा अपवाद वगळता इतर सर्व ठिकाणी जवळपास विश्रांती घेतली होती. परंतु दुपारनंतर पुन्हा ढगांच्या गडगडाटासह कमीजास्त प्रमाणात पाऊस सुरू झाला. सायंकाळी पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे दिसत होती.

माळशिरस तालुक्यात २६.६ तर करमाळा तालुक्यात १०.७ मिलीमीटर पाऊस झाला. त्या तुलनेत माढा (६.७), सांगोला (५.५), मंगळवेढा (२.९), दक्षिण सोलापूर (२.८), मोहोळ (२) याप्रमाणे यथातथा पावसाची नोंद झाली. मे महिन्यासारख्या अतिउष्ण उन्हाळ्यात वळवाचा पाऊस जेमतेम म्हणजे महिनाभरात केवळ २५.१ मिमी इतका पाऊस पडतो. परंतु यंदा प्रथमच मे महिन्यात आतापर्यंत १३ दिवसांत पडलेला वळीव एकूण (१७१.४ मिमी) सरासरीपेक्षा जवळपास सातपटापर्यंत आहे.

एरवी, सदैव कमी पावसाचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळशिरस तालुक्यात मे महिन्यात पडणारा सरासरी पाऊस केवळ १६.३ मिमी इतकाच नोंदविला जातो. प्रत्यक्षात यंदा आतापर्यंत १० दिवसांत तब्बल चौदा पटींपेक्षा जास्त म्हणजे २४१.२ मिमी (१४७९.८ टक्के) इतका पाऊस झाला आहे. सर्वात कमी १२७.७ मिमी (४८१.५ टक्के) पाऊस अक्कलकोट तालुक्यात झाला आहे. करमाळा (२१५.३ मिमी, ८४७ टक्के), माढा ( २०८.४ मिमी, ७८९ टक्के), पंढरपूर (१२८.२ मिमी, ६३१ टक्के), सांगोला (१७२.४ मिमी, ५६९ टक्के) याप्रमाणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाचा जोर दिसून येतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाचा जोर कमीजास्त प्रमाणात कायम असल्याने आणि पाऊस विश्रांती घेत नसल्याने खरीप हंगामात पेरणीपूर्व मशागतीची कामे थांबली आहेत. अनेक भागात शिवारामध्ये पावसाचे पाणी साचले आहे.