विधान परिषदेतील भाजप समर्थक प्रशांत परिचारक यांनी सीमेवरील जवानाविषयी वादग्रस्त विधान करुन रोष ओढावून घेतला आहे. राजकारण कसे असते हे सांगताना परिचारक यांनी जवानाविषयी वादग्रस्त विधान केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमदार प्रशांत परिचारक हे सोलापूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भोसे येथील प्रचारसभेत त्यांची जीभ घसरली. या सभेत परिचारक यांनी राजकारण काय असते हे सांगताना सीमेवरील जवानाविषयीचे विधान केले. ‘सीमेवरील जवान वर्ष भर घरी येत नाही. तरीदेखील घरी आल्यावर त्याला मुलगा झाल्याचे समजते आणि तो गावात मुलगा झाल्याच्या आनंदात पेढेही वाटतो’ असे संतापजनक विधान त्यांनी केले. विशेष म्हणजे परिचारक यांनी हे विधान केल्यानंतर उपस्थितीही हसत होते. एका आमदाराने सीमेवरील जवानाविषयी असे विधान केल्याने वाद निर्माण झाला. परिचारक यांची व्हिडिओ क्लिपही व्हायरल होत असून या घटनेमुळे परिचारक यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत आहे. या विधानावर अद्याप परिचारक यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजपने त्यांच्या आमदार आणि नेत्यांची कार्यशाळा घ्यावी. जाहीर सभेत काय बोलावे याचे भान त्यांच्या नेत्यांना नाही असे शेट्टी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. आमदाराने असे संतापजनक विधान करणे निंदनीय असून त्यांनी जवानांची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली.  प्रशांत परिचारक हे अपक्ष आमदार असून शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapur mlc prashan paricharak controversial statement on army jawan
First published on: 18-02-2017 at 23:45 IST