सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदावर पक्षाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांची वर्णी लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पदनियुक्तीचे पत्र पाटील यांना दिले.

पक्षाचे जिल्हाध्यक्षपद गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त होते. तत्कालीन जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचा राजीनामा देऊन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश केला होता आणि त्या पक्षाच्या चिन्हावर त्यांनी सांगोला विधानसभेची निवडणूक लढविली होती. तेव्हापासून रिक्त असलेल्या या पदावर कोणाची नियुक्ती होणार, याची उत्सुकता होती. नूतन जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील राहणारे आहेत. त्यांनी यापूर्वी पक्षाच्या संघटनात्मक विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. यापूर्वी ते पक्षाचे जिल्हाध्यक्षपदी कार्यरत होते. आता दुसऱ्यांदा त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

यापूर्वी २०१२ पासून ते आजतागायत ते पक्षाचे प्रदेश प्रवक्ते होते. याशिवाय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदही त्यांनी सांभाळले होते. सोलापूर जिल्हा परिषदेसह जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य असलेल्या उमेश पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी मानले जातात.

तथापि, इकडे सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः मोहोळ तालुक्यातील पक्षांतर्गत राजकारणात उमेश पाटील आणि स्थानिक वजनदार नेते, माजी आमदार राजन पाटील-अनगरकर यांच्याशी असलेला संघर्ष सर्वश्रुत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मोहोळ मतदारसंघात राजन पाटील यांच्या निकटचे माजी आमदार यशवंत माने यांच्या विरोधात उमेश पाटील यांनी सर्वपक्षीय मंडळींना एकत्र आणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांना निवडून आणण्यात पुढाकार घेतला होता. याउपर उमेश पाटील यांच्या विरोधात राजन पाटील यांनी पक्षश्रेष्ठींकडे वेळोवेळी तक्रारी करूनही त्याची दखल घेतली नाही. उलट, आता त्यांच्यावर पक्षाचा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार राजन पाटील हे पक्षात राहून शांत बसण्याची भूमिका घेत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उमेश पाटील यांचे बंधू संतोष पाटील यांनी पूर्वी काँग्रेसमध्ये दाखल होऊन झटपट पक्षाचे जिल्हाध्यक्षपदही भूषविले होते. नंतर अल्पावधीतच त्यांनी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता. सध्या ते भाजपमध्ये राणे समर्थक म्हणून ओळखले जातात.