सोलापूर : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांची वाटमारी करून ट्रॅक्टर ट्रॉलीसह अन्य सामानासह एका टोळीचा शोध सोलापूर ग्रामीण पोलिसांनी लावला आहे. एका चौकडीला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून लुटून दिलेले दहा ट्रॅक्टर, एक छकडा ट्रेलर आणि दोन मोठे ट्रेलर असा सुमारे ५५ लाख ६५ हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.जिग्नेश अंजाबापू आडगळे (वय १९, रा. टाकसान, ता. माजलगाव, जि. बीड), विजय राजू साळवे (वय २४), प्रदीप उर्फ भगत भगवान तौर (वय २२, रा. शेळगाव थळी, जि. बीड) आणि धीरज बाळू कारके (वय वय २३, रा. पाथरवाळा, ता. अंबड, जि. जालना) अशी या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या चौकडीची नावे आहेत. त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

गेल्या १३ जानेवारी रोजी बार्शी तालुक्यात इंद्रेश्वर साखर कारखान्याच्या रस्त्यावर एका ट्रॅक्टर चालकाला तिघा चोरट्यांनी अडवून बेदम मारहाण केली होती. त्याचे हातपाय बांधून आणि तोंडाला मफलर बांधून त्यास रस्त्याच्या कडेला टाकून देण्यात आले होते. ताब्यातील ट्रॅक्टर व ट्रेलर लुटून देण्यात आला होता. या गुन्ह्याची नोंद बार्शी तालुका पोलीस ठाण्यात आल्यानंतर सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या गुन्ह्याचे गांभीर्य पाहून सखोल तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार तपासाची चक्रे फिरवत असताना या टोळीचा शोध लागला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बार्शी तालुका पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अटकेतील टोळीकडून बार्शीसह टेंभुर्णी, आंबेजोगाई तसेच कर्नाटकातील मुधोळ (जि. बागलकोट) येथे ट्रॅक्टर, ट्रेलर व अन्य साहित्य लुटण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. जप्त ट्रॅक्टरपैकी सहा ट्रॅक्टरमालकांचा शोध घेण्यात येत आहे.