सोलापूर : सांगोला वनविभागाच्या एखतपूर, धायटी, चिंचोली व अन्य भागांत लांडग्याने आतापर्यंत नऊ लोकांवर हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. या सर्व घटनास्थळांना आणि जखमी लोकांच्या भेटीसाठी वनविभागाची यंत्रणा धावून गेली आहे. सर्व जखमींना सोलापूर व सांगोला येथे पाठविण्यात आले आहे. जखमींची प्रकृती स्थिर असून, त्यांना शासकीय मदतीची कार्यवाही करण्यात येत आहे.
या भागात दिवस रात्र गस्त घालण्यासाठी, मानव आणि वन्यजीवांतील संघर्ष कमी करण्यासाठी व वन्यजीव पकडण्यासाठी पुणे व सोलापूर येथील वन्यजीव बचाव पथक सांगोला भागात दाखल झाले आहेत.
रात्री-अपरात्री एकट्याने घराबाहेर पडणे टाळावे, लांडगा सकाळ व सायंकाळच्या वेळेस जास्त प्रमाणात सक्रिय असतो. घराबाहेर पडताना शक्यतो तर तीन-चार व्यक्तींच्या गटाने बाहेर पडा आणि सोबत काठी आणि विजेरी ठेवा. रात्रीच्या वेळी लहान मुलांना आणि वृद्ध मंडळींना घराबाहेर एकटे सोडू नका. त्यांची विशेष काळजी घ्यावी. रात्रीच्या वेळी अंगणात उघड्यावर झोपू नका. पाळीव प्राण्यांना बंदिस्त आणि सुरक्षित ठिकाणी ठेवा. अचानक लांडग्याशी सामना झाल्यावर त्यांना डिवचतण्याचा प्रयत्न करू नका. उलट घाबरून न जाता मोठ मोठ्याने आवाज करा. वन्यप्राणी दिसल्यास वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी एस. व्ही. मगर यांनी केले आहे.