सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बार्शी तालुकाध्यक्ष शांताराम जाधव यांचे वाहन पेटविल्याची घटना नुकतीच उजेडात आली आहे. त्याची दखल घेऊन पक्षाचे युवा नेते, आमदार रोहित पवार यांनी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. तर याउलट माजी आमदार राऊत यांनीही आमदार रोहित पवार यांच्यावर पलटवार केला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी बार्शीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष शांताराम जाधव यांचे वाहन पेटविण्यात आले होते. या मागे राजेंद्र राऊत यांचे पुत्र रणवीर राऊत यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वी, रणवीर राऊत यांनी शांताराम जाधव यांना उद्देशून थेट समोरासमोर अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती. त्याची चित्रफीत समाज माध्यमातून तुफान गाजली होती.
या पार्श्वभूमीवर शांताराम जाधव यांची मोटार पेटविल्याचा रोष आमदार रोहित पवार यांनी राजेंद्र राऊत यांच्यावर व्यक्त केला आहे. राऊत यांची गुंडगिरी, व्यवसाय आणि पैसा कसा आला, हे संपूर्ण सोलापूर जिल्हा जाणत आहे. मला पुन्हा बोलायला लावू नका, असा दम आमदार रोहित पवार यांनी राऊत यांना भरला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. तुमचे आजोबा काय काम करीत होते, तरीही तुमच्याकडे एवढा पैसा कोठून आला. खरे तर त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर रोहित पवार यांनीही राऊत यांना जशास तसे उत्तर दिले.
घडी तुमची आणि सरकारही तुमचेच आहे. पण आमची ईडी चौकशी झाली. त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. पण आता राऊत यांनी आपल्या पुत्राचे पाहावे, चित्रफीतीतील काय ती उर्मट भाषा, काय ती शिवीगाळ आणि काय तो मस्तवालपणा, हे सारे महाराष्ट्रात उघडे करू तर तुम्हाला महाराष्ट्रभर कोठेही फिरायला जागा उरणार नाही, अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी राऊत यांना दम दिला आहे.
.