सोलापूर : अंगाची लाही लाही करणाऱ्या मे महिन्यातील तीव्र उन्हाळ्यात यंदा प्रथमच सोलापूर जिल्ह्यात १७ दिवसांत २३३ मिलीमीटर इतका मोठा पाऊस पडला आहे. यात एकूण १७ महसूल मंडळांमध्ये ३०० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची नोंद झाली आहे. तर ४१ महसूल मंडळांमध्ये २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडल्याचे जिल्हा प्रशासनाने अधिकृतपणे सांगितले. सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यात सरासरी जेमतेम २५.१ मिमी इतकाच बेताचा वळिवाचा पाऊस पडतो.

प्रत्यक्षात यंदा पहिल्यांदाच एकूण सरासरीच्या नऊपटांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अनेक भागांत शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन घरांची पडझड झाली आहे. शिवाय जनावरेही दगावली आहेत. वीज कोसळून दोघांचा तर घराचे छप्पर अंगावर कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या नुकसानीच्या प्राथमिक पाहणीनुसार सुमारे चार हजार हेक्टर बागायती शेतीचे नुकसान झाले आहे. मात्र, प्रत्यक्षात हे नुकसान जास्त असल्याचे बाधित भागातील शेतकऱ्यांकडून सांगितले जाते.

पावसाने कहर केल्यामुळे भीमा, सीना व नीरा या तिन्ही नद्यांसह भोगावती, कोरडा, हरणा, माण व इतर नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. तर काही नद्यांना पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. मे महिन्यात जिल्ह्यात १७ दिवस पावसाची नोंद झाली असून, एकूण पडलेला पाऊस २३३ मिमी एवढा आहे. सर्वाधिक २८६.३ मिमी पाऊस माळशिरस तालुक्यात तर त्या खालोखाल २८० मिमी पाऊस उत्तर सोलापूर तालुक्यात तर २७१.८ मिमी पाऊस करमाळा तालुक्यात पडला आहे. माढा (२६६), बार्शी (२५५), दक्षिण सोलापूर (२२१.७), सांगोला (२१९.४), मोहोळ (२१३), अक्कलकोट (२०९.९), मंगळवेढा (१८५.९) आणि पंढरपूर (१५७) याप्रमाणे पावसाची जिल्हा प्रशासनाने नोंद केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यात दहिगाव, नातेपुते, लवंग आणि महाळुंग (ता. माळशिरस) या चार महसूल मंडळांमध्ये ३०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर माढा तालुक्यातील दारफळ, रोपळे, म्हैसगाव आणि टेंभुर्णी येथेही ३०० मिमीहून जास्त पाऊस झाला आहे. करमाळा तालुक्यातील जेऊर, सालसे आणि उमरड येथेही ३०० मिमीपेक्षा पावसाची नोंद झाली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात मार्डी, सोलापूर व वडाळा या तीन महसूल मंडळातही ३०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.