सोलापूर : कांदा लिलावासाठी संपूर्ण राज्यात विख्यात असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे लिलाव आता सकाळबरोबर सायंकाळीही सुरू झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी सोय होत आहे.
सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या ६४ वर्षांच्या इतिहासात प्रथमच सायंकाळीही सुरू झालेल्या भाजीपाल्याच्या लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती, माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते झाला. पहिला लिलाव स्वतः माने यांनी पुकारला. दररोज सकाळ आणि सायंकाळच्या सत्रांत सुरू झालेल्या या लिलावाबद्दल शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीत सोलापूरसह शेजारच्या धाराशिव, बीड, लातूर, तसेच कर्नाटकातील विजापूर, कलबुर्गी आदी भागातून शेतमाल विक्रीसाठी येतो. भाजीपाला प्रामुख्याने जवळच्या अंतरावरून येत असताना दररोज सकाळी भाजीपाल्याचा लिलाव होत होता. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची धावपळ होत असे.
शेतकऱ्यांना गावातून शेतमाल घेऊन यायला उशीर झाल्यास तोपर्यंत लिलाव संपलेला असे. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत असे. ही अडचण विचारात घेऊन सभापती दिलीप माने यांनी सर्वांशी चर्चा करून सकाळबरोबर सायंकाळी भाजीपाल्याचा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला. शेपू, भेंडी, कोथिंबीर, दोडका, गवार, फ्लॉवर, कोबी, टोमॅटो, पालक, अंबाडी, मेथी, चाकवत, वांगी, बटाटा, घेवडा, भुईमूग आदी भाजीपाल्याची आवक वाढली असून, भावही स्थिर राहिले आहेत. त्याचा लाभ शेतकऱ्यांना होत आहे.
सायंकाळी सुरू झालेला भाजीपाला लिलाव पुकारताना बाजार समितीचे उपसभापती सुनील कळके, संचालक सुरेश हंसापुरे, प्रथमेश पाटील, नागण्णा बनसोडे यांच्यासह प्रभारी सचिव अतुल राजपूत आदी उपस्थित होते.