सोलापूर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ऑगस्टपासून भारतातून होणाऱ्या वस्तूंवर ७५ टक्के टेरिफ आणि अतिरिक्त कर लादण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय उद्योग आणि शेती क्षेत्रावर गंभीर परिणाम होणार आहेत. दुसऱ्या बाजूला रशियाकडून भारत तेल व शस्त्रास्त्रे विकत घेत असल्याने ती खरेदी थांबवण्याची धमकीही ट्रम्प यांनी दिली आहे. त्याच्या निषेधार्थ राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा पुतळा सोलापुरात ‘सिटू’च्यावतीने जाळण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार नरसय्या आडम यांनी केले. सिटूचे राज्य महासचिव एम. एच. शेख, ‘सिटू’चे राज्य उपाध्यक्ष युसूफ शेख, नलिनी कलबुर्गी, नसीमा शेख, ॲड. अनिल वाशिम, दत्ता चव्हाण, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, व्यंकटेश कोंगारी, रंगप्पा मरेड्डी, दाऊद शेख, विल्यम ससाणे, लिंगवा सोलापुरे, शकुंतला पाणीभाते आदींचा सहभाग यावेळी आक्रमक होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात पोलीस आणि आंदोलन कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली.
माजी आमदार आडम म्हणाले, या कृतीतून अमेरिकन साम्राज्यवादाचा कुरूप चेहरा उघड झाला आहे. भारताच्या सार्वभौमत्वावर आणि स्वतंत्र व्यापार धोरणावर थेट आक्रमण होत आहे. अमेरिकन टेरिफमुळे सोलापुरातील मुख्य उत्पादन टॉवेल्स आणि चादर निर्यातीस बंदी असल्यामुळे सुमारे अडीचशे कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. यामुळे हजारो कामगारांच्या रोजी रोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. टेरिफ कर म्हणून पाडा अन्यथा रस्त्यावरची लढाई आणखी तीव्र करण्याचा इशारा आडम यांनी दिला आहे. एम. एच. शेख यांनी भूमिका मांडताना सांगितले की, भारताने अशा कारस्थानांना बळी पडू नये. नुकत्याच झालेल्या युरोपियन युनियन आणि युनायटेड किंग्डम सोबतच्या सीईटीएसारख्या करारामध्ये झालेल्या तडजोडीमुळे शेती, दुग्ध व्यवसाय आणि औद्योगिक क्षेत्रावर संकट अधिक गडद झाले आहे, असे त्यांनी म्हटले.