सातारा : पाचगणी पालिकेने सिडने पॉईंटवर सहा महिन्यांपूर्वी उभारलेला अत्याधुनिक ‘सोलर ट्री’ जोरदार वारे आणि मुसळधार पावसात कोसळला. सुदैवाने हा सोलर ट्री कोसळताना परिसरात पर्यटक नसल्यामुळे कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी झालेले हे काम कोसळल्यामुळे नागरिक संतप्त झाले असून, या कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. या घटनेने पालिकेच्या निकृष्ट विकासकामांचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे.

पाचगणी गिरिस्थान पालिका हद्दीतील सर्व पर्यटन पॉईंट सुशोभीकरणासाठी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून आणि पर्यटन निधीतून कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळते. गिरिस्थान पालिका कोट्यवधी रुपये दरवर्षी खर्च करीत असते. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सर्व पॉईंटवर पर्यटकांसाठी खेळणी बसवणे, पॅगोडा, झुलते पूल, गॅलरी अशा विविध कामांसाठी लाखो रुपये खर्च करीत आहे. मात्र, ही कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा नागरिकांचा आरोप आहे. ठेकेदाराला कामाचे आदेश दिल्यानंतर या कामावर पालिकेच्या यंत्रणेबाबत लक्ष दिले जात नाही. कार्यालयात बसूनच काम उत्कृष्ट झाल्याचा अहवाल सादर केला जातो. अशा तक्रारी नागरिक करत आहेत. याबाबत जिल्हा पालिका प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे नागरिकांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले .

आज झालेल्या घटनेत सहा महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेल्या ‘सोलर पॅनल ट्री’चे काम निकृष्ट झाल्याचे उघडकीस आले. सिडने पॉईंट व टेबल लँडवर प्रत्येकी एक असे दोन सोलर ट्री बसवले आहेत. हे काम ज्या ठेकेदाराने केले आहे. ते पूर्णपणे निकृष्ट केले असल्याचे निदर्शनास येत होते. याबाबत पालिका स्तरावर वेळोवेळी तक्रारी करण्यात येत होत्या. मात्र, या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने केलेले काम उघडकीस आले आहे.

पाचगणी नगरपालिकेने सिडने पॉईंट येथे लाखो रुपये खर्च करून डिझाईन मध्ये, सॉलर युनिट बसवले होते. थोड्याशा वाऱ्याच्या झोताने हे काम कोसळले. यातून हे काम निकृष्ट दर्जाचे होते, हे सिद्ध झाले आहे. याची चौकशी करत ठेकेदारावर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे.दीपक कांबळे, सामाजिक कार्यकर्ते

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सिडने पॉईंट’ हा उंंचावर असून, या ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त असतो. सध्या पाऊस सुरू असून, या ठिकाणी जोराचे वारे वाहत आहे. या वाऱ्याने हे युनिट कोसळले आहे. तरी आम्ही संबंधित ठेकेदाराच्या कामाची चौकशी करणार आहोत. निखिल जाधव, मुख्याधिकारी.