Somnath Suryawanshi Mother Vijayabai on Autopsy Report : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावर शुक्रवारी (१८ जुलै) विधानसभेत मोठं वक्तव्य केलं. सूर्यवंशी यांचा मृत्यू सुरूवातीच्या कारणांमध्ये शॉक फॉलोईंग मल्टिपल इन्ज्युरीज असं कारण देण्यात आलं होतं. त्यानंतर हिस्टोपॅथोलॉजीच्या रिपोर्टमध्ये ट्रिपल व्हेसल डिसीजचा गंभीर आजार असल्यामुळे मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. या मृत्यूसंदर्भात दोन वेगवेगळी कारणं असलेले अहवाल समोर आले. त्यामुळे आम्ही दोन्ही अहवाल मुंबईतील जेजे. जे.जे. शासकीय रुग्णालायत पाठवले. त्यानंतर जे. जे. रुग्णालयाने दिलेल्या अहवालात सूर्यवंशी यांचा मृत्यू कोरोनरी आर्टरी डिसीज विथ अक्युट कोरोनरी सिंड्रोममुळे झाल्याचं म्हटलं आहे. सरकार अजूनही अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलेलं नाही. याबाबत सरकारने नेमलेल्या आयोगाचा अंतिम अहवाल आल्यानंतरच अंतिम निष्कर्ष काढला जाईल.
देवेंद्र फडणवीस यांच्या या माहितीवर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने म्हणजेच विजयाबाई सूर्यवंशी यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्या म्हणाल्या, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल सभागृहात धडधडीत खोटं बोलले. हे संपूर्ण महाराष्ट्राला कलंक लावणारं वक्तव्य होतं. त्यांचं वक्तव्य ऐकून माझ्या पायाखालची वाळू सरकली. माझ्या मुलाला पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान अटक केली आणि पोलीस ठाण्यात नेऊन मारहाण केली. त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात नेण्यात आला होता. तिथल्या एमबीबीएस डॉक्टरांनी कॅमेऱ्यासमोर शवविच्छेदन केलं. त्यांच्या अहवालात पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं.”
विजयाबाई सूर्यवंशी म्हणाल्या, “कुणीही माझी किंवा न्यायालयाची परवानगी न घेता मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पुन्हा एकदा नवे शवविच्छेदन अहवाल तयार केले. त्या अहवालांच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला कलंक लावणारं वक्तव्य केलं. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी खोटं बोलू नये. त्यांनी या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालू नये. त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचं पालन करावं. अहवालात सुरुवातीला जे सांगण्यात आलं होतं ते सत्य महाराष्ट्राला सांगावं. खोटे अहवाल सादर करून अजून किती जणांची फसवणूक करणार आहात? एका बाजूला महाराष्ट्रातील महिलांना लाडकी बहीण म्हणायचं आणि त्याच बहिणीविरोधात खोटं बोलायचं हे योग्य नाही.” सूर्यवंशी या एबीपी माझाशी बोलत होत्या.
विजयाबाई सूर्यवंशींचा टाहो
सोमनाथ सूर्यवंशी याची आई म्हणाली, “माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी आरोपीला पाठीशी घालू नये. न्यायालयाचा आदेश आहे की अशा खून प्रकरणात सात दिवसांत आरोपीला अटक व्हायला हवी. त्या आदेशाचं पालन करावं. मुख्यमंत्र्यांनी नागपूर, हैदराबाद किंवा कुठूनही खोटे अहवाल आणावे आणि सभागृहात सादर करून महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लागेल असे वक्तव्य करावं हे योग्य नाही. आजपर्यंत कुठलाही मुख्यमंत्री इतका खोटं बोललेला नाही. कोम्बिंग ऑपरेशन झालं हे खरं आहे. त्यादरम्यान माझ्या मुलाला अटक केली आणि पोलिसांनी पोलीस ठाण्यात येऊन माझ्या मुलाला मरेपर्यंत मारलं हे देखील खरं आहे. त्या मारहाणीत त्याचा खून झाला हे देखील खरं आहे. तसा अहवाल देखील समोर आला आहे. तेच मुख्यमंत्र्यांनी राज्याला सांगावं. त्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान अनेकांचे हात-पाय मोडले. अनेक तरुण अपंग झाले. अनेक महिला अपंग झाल्या. माझं लेकरू त्यात मारलं गेलं. काही जणांची लेकरं अपंग झाली.”