नांदेड : नांदेडच्या लोहा तालुक्यातील नसरत सावरगाव परिसरात मन हेलावून टाकणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे. अवघ्या ४८ तासांत एका शेतकरी कुटुंबातील दोन कर्त्यांचा अंत झाला. या कुटुंबातील २७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्यानंतर दोन दिवसांनी कुटुंबप्रमुख वडिलांचा मृत्यू झाला. त्याच वेळी आईला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. अवघ्या ४८ तासांत एकाच कुटुंबातील या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

राहुल बेदरे (वय २७) आणि भीमराव बेदरे (वय ६०) असे मृत बाप-लेकाचे नाव आहे. तर, शोभाबाई बेदरे यांच्यावर उपचार सुरू आहेत. सावरगाव येथील भीमराव बेदरे यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांना ४ एकर कोरडवाहू शेती आहे. राहुल हा त्यांचा एकुलता मुलगा होता. त्याने अशाप्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याने वडील भीमराव बेदरे यांना धक्का बसला. मंगळवारी (१० जून) मुलाच्या अंत्यविधीनंतर घरी येताच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. मुलापाठोपाठ पतीचाही मृत्यू झाल्याने शोभाबाईदेखील खचून गेल्या. त्यांनाही हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर लोहा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पतीचे अंतिम दर्शनही शोभाबाई घेऊ शकल्या नाहीत. गावकऱ्यांनीच काही नातेवाइकांच्या उपस्थितीत भीमराव यांच्यावर अंत्यसंस्कार केले. अवघ्या ४८ तासांत कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.