दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळीत वडिलांनी आईला मारहाण केल्याने मुलाने वडिलांना इतकी बेदम मारहाण केली की त्यात त्यांचा मृत्यू झाला. शिवाजी थोरात यांनी आपल्या पत्नीला घरगुती भांडणाच्या रागातून कुर्‍हाडीने पाठीवर वार केला. आई कुर्‍हाडीने वार केल्याने जखमी झाल्याचे पाहून मुलगा तानाजीने रागाच्या भरात वडील शिवाजी थोरात यांना झाडाला बांधून काठीने जबर मारहाण केली.

मुलाचे मामा भीमराव जाधव यांनीही आपल्या बहिणीला कुर्‍हाडीने मारहाण झाल्याच्या रागातून आरोपी मेव्हुण्याला शिवीगाळ केली. तसेच लाकडी काठीने दोन्ही हात, पाय, मांडी आणि छातीवर मारहाण केली. या मारहाणीत शिवाजी थोरात यांचा मृत्यू झाला.

शिवाजी थोरात यांना बेदम मारहाण करून हत्या केल्याच्या गुन्ह्यात मुलगा तानाजी थोरात व मेव्हुणे भीमराव जाधव या दोन्ही आरोपींवर भारतीय दंड विधान (आयपीसी) कलम ३०२, १७७, ३४२, ५०४, ३४ प्रमाणे मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे यांनी दिली.

नेमकं काय घडलं?

या प्रकरणात नेमकं काय घडलं याची माहिती देताना पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे म्हणाले, “मंद्रूप पोलीस ठाण्यात १३ ऑगस्ट २०२२ रोजी अकस्मात मृत्यू क्र. ५८/२०२२ दाखल झाला. त्यात मृत व्यक्तीचा मोटारसायकलवरून पडून मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं. मात्र, त्या अकस्मात मृत्यूचा तपास करताना हा मृत्यू मोटारसायकलवरून पडून नाही, तर मारहाणीमुळे झाल्याचं निष्पन्न झालं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मृत व्यक्तीला नारळाच्या झाडाला बांधून मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे,” अशी माहिती मांजरे यांनी दिली.