रत्नागिरी – रत्नागिरी शहरालगत नाचणे सुफलवाडी परिसरात मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास मुलाने वडिलांनी केलेल्या कर्जामुळे हैराण होऊन एका धारदार सुऱ्याने आपल्या आईचा गळा चिरुन ठार मारले. तसेच स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत शशिकांत तेली (वय २५) या तरुणाने धारधार चाकूने आपली आई पूजा शशिकांत तेली यांचा गळा चिरून ठार केले. त्यानंतर त्याने स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला.
रत्नागिरी शहराजवळ असणाऱ्या नाचणे गावातील सुपल वाडी येथे पूजा तेली आणि त्यांचा मुलगा अनिकेत राहत होते. अनिकेतने आईच्या गळ्यावर वार केले, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला पाहून अनिकेतने स्वतःच्या हाताची नस कापून घेतली. आईचा गळा कापल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत असलेला अनिकेत घराबाहेर येऊन बसला, तेव्हा शेजाऱ्यांनी ही घटना पाहिली आणि पोलिसांना माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विवेक पाटील आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आणि पंचनामा सुरू केला. पूजा तेली यांचे शव शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. अनिकेतचे वडील शशिकांत तेली यांनी सहा महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर अनिकेत आणि त्याची आई पूजा एकटेच राहत होते.
अनिकेतने हाताची नस कापल्याने त्याला पोलिसांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.