बर्मिंघम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सांगलीच्या संकेत सरगरने रौप्यपदक पटकावत भारताचे पदकांचे खाते उघडले आहे. वेटलिफ्टींगमध्ये ५५ किलोग्रॅम वजनी प्रकारात त्यानं ही कामगिरी केली. क्लीन अँड जर्क या दुसऱ्या फेरीत झालेल्या दुखापतीनंतरही त्यांनी सुर्वण पदकासाठी प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आले नाही. २१ वर्षीय संकेतच्या नावावर सिंगापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंगमध्ये स्पर्धेत २५६ किलोग्रॅम वजन उचलण्याचा विक्रम आहे. तसेच राष्ट्रीय स्थरावरही त्यांने अनेकदा पदकं मिळवली आहेत.

संकेत सरगर हा मुळचा सांगलीचा आहे. त्याचे वडिलांच्या पान आणि चहाचा गाडा चालवून आपल्या परिवाराचा उदरर्निवाह करतात. संकेतही त्यांनी मदत करतो. संकेत त्याच्या वडिलांच्या चहाच्या गाड्यावर मुंगाचे वडे आणि वडा पाव बनवतो. तसेच पानटपरीदेखील चालवतो. संकेतच्या वडिलांनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांना चांगले शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात यशस्वी खेळाडू बनवले आहे. सरगर यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्यापैकी काजल आणि संकेत हे दोघेही वेटलिफ्टर आहेत. तर दुसरा मुलगा जीवन हा सध्या शिक्षण घेत आहे. दोघांनी आयुष्यात पुढे जावे अशी त्यांची इच्छा आहे. संकेतने जिंकलेल्या पदकानंतर माझी ओळख बदलली असल्याचे त्याचे वडील अभिमानाने सांगतात.

हेही वाचा – राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने खातं उघडलं; वेटलिफ्टींगमध्ये सांगलीच्या संकेत सरगरला रौप्यपदक

दोन महिन्यांपूर्वी हरियाणामधील पंचकुला येथे झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्समधील वेटलिफ्टिंगमध्ये संकेतची लहान बहीण काजल हीनेही महाराष्ट्राला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते. संकेत आणि काजल या बहिण-भावांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवून मोठी कामगिरी केली आहे.

संकेत हा कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा इतिहासाचा विद्यार्थी आहे. त्याने खेलो इंडिया युथ गेम्स २०२० आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२० मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. गेल्या वेळी राष्ट्रकुल स्पर्धेत सतीश शिवलिंगम आणि रंगला वेंकट राहुल यांनी सुवर्ण जिंकले होते. संकेतला मात्र, ही कामगिरी करता आली नाही.

हेही वाचा – बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा : भारतीय संघांचा विजयारंभ ; हम्पीची रोमहर्षक सरशी; साधवानी, विदितचीही चमकदार कामगिरी

२०१८ च्या राष्ट्रकूल स्पर्धेत गुरुराज पुजारी यांना रौप्यपदक जिंकल्याचे पाहून संकेतचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते. “मला तो दिवस आठवतो. मी चहाच्या गाड्यावर बसलो होतो. त्यावेळी गुरुराज यांना मी राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकताना पाहिले. मला विश्वास होता की मीदेखील एक दिवस अशीच कामगिरी करू शकेन, अशी प्रतिक्रिया संकेतने ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना दिली. त्याचे वडील वेटलिफ्टिंग प्रशिक्षक नाना सिंहासने यांचे चाहते आहेत. सिंहासने यांचे दिग्विजय वेटलिफ्टिंग सेंटर त्यांच्या चहाच्या गाड्याजवळच आहे. संकेतने इथूनच सरावाला सुरुवात केली होती.

दरम्यान, कोविडमुळे त्याच्या सरावात अनेक अडचणी येत होत्या. तरीही त्याचा घरीच हलका सराव सुरू होता. तेंव्हा त्याच्या मित्राने घरी बारबेल आणि स्क्वॅट सेट पाठवले. मात्र, याच काळात त्याला पाठिच्या दुखापतीचा त्रास सुरू झाला आणि सोबतच वडिलांचा व्यवसायही बंद होता. त्यामुळे त्याने सराव बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र वडिलांनी त्याला त्याने जिंकलेल्या पदकाचे वृत्तपत्रांचे कात्रण दाखवत प्रेरणा दिली, असंही संकेत सांगतो.