लोकसत्ता वार्ताहर

कराड : भारत इतिहास संशोधन मंडळाचे आजीव सदस्य असलेले वाळवा तालुक्यातील वाटेगावचे इतिहास अभ्यासक अतुल मुळीक यांच्या संग्रहातील शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनातील हे प्रदर्शन पाहताना आबालवृद्ध भारावून गेले.

मुंबईचे संस्कार स्पेशल फाउंडेशन, ध्रुवतारा फिल्म प्रोडक्शन, लिफ्टस् वाईब मीडिया यांच्या विद्यमाने आयोजिलेल्या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनात शिवकालीन धोप तलवारी, पट्टा, खांडा, जबरदंड, शिरस्त्राण, इटा, बरछा, विजयनगर कट्यार, मराठा, मुघल, राजस्थानी कट्यारी, जंबिया, बिचवे, खंज्राली, तोफांचे गोळे, विविध प्रकारच्या कुऱ्हाडी, धनुष्यबाण, माडू, नायर तलवार, ढाली, कर्द, पेशकब्ज, ठासणीच्या बंदुका, त्याचबरोबर अनेक लहान- मोठी अशी शंभरांहून अधिक शस्त्रे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह नागरिकांनी गर्दी केली होती. या वेळी प्रत्येक शस्त्राची माहिती सविस्तरपणे देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शस्त्रांसोबतच शिवराज्याभिषेकावेळी रायगड टांकसाळीत तयार झालेली शिवराई लोकांसाठी अपूर्वाई ठरली. प्रदर्शनात सर्वात आकर्षण ठरले ते उंटावरील झांम्बुराक तोफेचे. मध्ययुगात वापरल्या जाणाऱ्या मोठ्या तोफा नागरिकांनी गड- किल्ल्यावर पाहिल्या आहेत. परंतु, इतिहास अभ्यासक व ऐतिहासिक वस्तू संग्राहक अतुल मुळीक यांच्या संग्रहात असणारी ही दुर्मीळ तोफ प्रदर्शनाची आकर्षण ठरली होती.