एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना एसटी कर्मचाऱ्यांची सरकारमध्ये विलिनीकरणाची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांसमोर ठेवेन, असं आश्वासन अनिल परब यांनी दिलं. तर मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपलं वजन वापरुन ही मागणी पुढे न्यावी, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना अनिल परब म्हणाले, “राज्य सरकारने आतापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी २,७०० कोटी रुपये दिले आहेत. कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्याची १७ टक्के मागणी असताना २८ टक्के महागाई भत्ता दिला आहे. तिजोरीवर भार पडत असताना मागण्या मान्य केल्या आहेत. पण तरीही एसटी विलिनीकरण्याचा मुद्दा घेऊन पुन्हा आंदोलन सुरु केलं. याला काही राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला”.

ताज्या घडामोडींसाठी येथे क्लिक करा.

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात प्रवीण दरेकरांनी केलेल्या मागणीविषयी अनिल परब यांनी आश्वासन दिलं आहे. ते म्हणाले, “मी विलिनीकरणाची मागणी मुख्यमंत्री आणि आघाडी सरकारच्या वरिष्ठ नेत्यांकडे ठेवेन. संपात सहभागी असलेल्या एकाही कर्मचाऱ्यावर कारवाई केलेली नाही. १५ ते १७ टक्के कर्मचारी संपात सहभागी आहेत. कर्मचाऱ्यांना आवाहन आहे की, त्यांनी आज संध्याकाळपासून कामावर यावं. दिवाळीत जर लोकांना त्रास झाला तर मात्र प्रशासकीय कामकाज म्हणून कारवाई करणं भाग पडेल”.

अनिल परब यांची भेट घेतल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना अनिल परब यांचे आभार मानले. ते म्हणाले,”पगार व्यवस्थित होत आहे. त्यांच्या महागाई भत्ता, वेतन आणि इतर भत्त्यात वाढ केली आहे. मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपले वजन वापरून ही मागणी पुढे न्यावी, ही विनंती. पण कर्मचाऱ्यांची जी प्रमुख मागणी आहे ती मी एमडींकडे केली आहे की एसटीची विलिनीकरण सरकारमध्ये व्हावे”.
मला कर्मचाऱ्यांच्या व्यथांची जाणीव आहे. कर्मचारी व्यथित झाले तर परिस्थिती चिघळेल. कारवाईचे दिलेले आदेश मागे घेण्याची विनंती आपण मंत्र्यांकडे केल्याचंही दरेकरांनी सांगितलं.

मंत्री महोदयांनी या विषयाकडे सकारात्मकतेनं पाहिलं आहे. आर्थिक मदत ही परिस्थिती बघुनच करावी लागेल. कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा. एक गणित व्यवस्थित जुळवून कारवाई करावी, अशी मागणी दरेकर यांनी अनिल परब यांच्याकडे केली आहे.