करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वंकष उपाययोजना करतांनाच श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील ५५ खाटांचा अतीदक्षता विभाग तातडीने कार्यान्वित करावा, अशी सुचना जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. सत्तार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., महानगर पालिकेचे आयुक्त अजीज शेख, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सत्तार यांनी जिल्ह्यातील करोना विषाणूची स्थिती नियंत्रणात असली, तरी गाफिल राहून चालणार नाही, असे सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अतीदक्षता कक्ष तातडीने कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे. जिल्हा प्रशासन सर्वंकष प्रयत्न करीत असले, तरी या प्रयत्नांना नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे. घराबाहेर पडतांना मुखपट्टीचा वापर करावा. तसेच वेळोवेळी रसायन, साबण लावून हात धुवावेत. तसेच सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन पालकमंत्री सत्तार यांनी केले. संपूर्ण कापूस खरेदीचे प्रशासनाने नियोजन करावे. कापसाप्रमाणेच शेतकऱ्यांकडील मक्याची माहिती घ्यावी. त्यासाठी कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे सचिव यांनी पंचनामा करून अहवाल सादर करावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ मिळवून द्यावा. युरियाची टंचाई भासणार नाही, असे नियोजन कृषी विभागाने करावे. जिल्ह्यातील निराधार व्यक्तींना शिवभोजनाचा लाभ देतांना जिल्हा पुरवठा विभागाने वेळोवेळी भोजनाची गुणवत्ता तपासावी, असे निर्देश पालकमंत्री सत्तार यांनी दिले. जिल्हाधिकारी संजय यादव यांनी करोना विषाणूमुळे होणारे मृत्यूदर रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविली असल्याचे सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत रोज ३०० नमुन्यांची तपासणी होत आहे. त्यामुळे रुग्ण संख्या वाढतांना दिसत आहे. लवकरच ही संख्या कमी होण्यास सुरूवात होईल. जिल्ह्यात ५६३२ खाटांची उपलब्धता करून ठेवण्यात आली आहे. त्यात २१६ अतीदक्षता विभागातील खाटांचा समावेश आहे. याशिवाय जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि अन्य दोन रुग्णालये मिळून ५०० खाटांना ऑक्सिजन पुरविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ही प्रक्रिया पुढील आठ दिवसांत पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री सत्तार यांच्या हस्ते करोना विषाणूच्या रुग्णांवरील उपचारासाठी रक्तद्रव दान करणाऱ्या मोहम्मद आसिफ सगीर अहमद शेख या तरुणाचा सत्कार करण्यात आला. तो महिनाभरापूर्वी कोरोना विषाणूमुक्त झाला. त्यानंतर त्याने रक्तद्रव दान केले. करोनामुक्त झालेल्या रुग्णांनी रक्तद्रव दान करण्यासाठी पुढे यावे, असेही आवाहन पालकमंत्री सत्तार यांनी केले.

सहा डॉक्टरांसह दोन तंत्रज्ञही करोनाबाधित

धुळे जिल्ह्यासह शहरात दररोज करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मंगळवारी ५८ तर, बुधवारी दुपापर्यंत १५ नवीन रुग्ण आढळून आले. त्यात हिरे रुग्णालयातील सहा डॉक्टर, चार तंत्रज्ञ आणि दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात बाधितांची संख्या ११४६ झाली आहे. त्यातील ५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धुळे शहर आणि शिरपूरमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. आठ दिवसांची आकडेवारी बघता दररोज १०० च्या आसपास चाचणी अहवाल सकारात्मक येत आहेत. दोन दिवसांपूर्वीच धुळे जिल्ह्यात करोना रुग्णांचा आकडा हजारापार गेला आहे. जिल्ह्यात मंगळवारी ५८ रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले. त्यात आता हिरे रुग्णालयातील सहा डॉक्टर, चार तंत्रज्ञ, दोन कर्मचाऱ्यांची भर पडली आहे.  बुधवारी दुपापर्यंत प्राप्त अहवालानुसार शहरातील वडणे कॉलनी, भावसार कॉलनी, नवे भदाणे, मुकटी, अंबिका नगर, सोनगीर, मुस्लिम नगर या परिसरात  रुग्ण आढळले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Start the intensive care unit at diamond hospital immediately abdul sattar abn
First published on: 02-07-2020 at 00:19 IST