सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात हॅण्डबॉल स्पर्धा चळवळ वाढीस आता सुरुवात होईल. जिल्हा सर्वागीण विकासात आघाडीवर असतानाच खेळातही चमकला पाहिजे, त्यासाठी पालकमंत्री नारायण राणे यांचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष, माजी आमदार राजन तेली यांनी केले.
३५वी ज्युनिअर मुले महाराष्ट्र राज्य हॅण्डबॉल अजिंक्यपद स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा हॅण्डबॉल असोसिएशनच्या पुढाकाराने येथे घेण्यात आली, त्या शुभारंभप्रसंगी राजन तेली बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र हॅण्डबॉल असोसिएशनचे अध्यक्ष साहेबराव पाटील, सेक्रेटरी अशोकसिंग राजपूत, क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित, जिल्हाध्यक्ष प्रतापराव तोरसकर, आयोजक अध्यक्ष लक्ष्मण पावसकर, सचिव रविदास शिरोडकर, संदीप कुडतरकर, दक्षता समिती सदस्य विकास सावंत, सेवादल जिल्हाध्यक्ष अण्णा केसरकर, भाऊ नाईक, सीताराम भोकमांगे, देवेंद्र चौगुले, मिलिंद शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते.
हॅण्डबॉल स्पर्धेने राज्याला अनेक पदके मिळवून दिल्याचे या वेळी सांगण्यात आले. त्याचा उल्लेख राजन तेली यांनी करून सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात हॅण्डबॉल स्पर्धेची चळवळ उभी राहावी त्यासाठी पालकमंत्री नारायण राणे यांचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे सांगून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सर्व क्षेत्रांत कायमच आघाडीवर राहिला आहे.
राज्यस्तरीय स्पर्धा सिंधुदुर्गात घेण्यासाठी पालकमंत्री कायमच पुढाकार घेऊन सहकार्य देत आहेत, असे राजन तेली यांनी सांगितले. हॅण्डबॉल स्पर्धेत जिंकण्यासाठी खेळा, असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्र हॅण्डबॉल असोसिएशन सेक्रेटरी अशोक सिंग राजपूत म्हणाले, राज्यातील ३५ जिल्ह्य़ांनी या खेळाला सहमती दर्शवून ग्रामीण भागात हा खेळ खेळला जात आहे. या खेळातील खेळाडूंना शैक्षणिक गुण, पोलीस व शासकीय भरतीत कायमच संधी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी संदीप कुडतरकर, क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित आदींनी विचार मांडले. या समारंभापूर्वी मशाल ज्योतीने सावंतवाडी शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. राज्यातील विविध जिल्ह्य़ांतून ५०० विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाल्याचे सांगण्यात आले.