मालेगाव, नांदेड, अमरावतीत दगडफेक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मालेगाव / नांदेड / अमरावती / ठाणे : त्रिपुरा येथे अल्पसंख्याकांवर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी राज्यात पुकारण्यात आलेल्या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. वाहने आणि दुकानांवर दगडफेक करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा सौम्य वापर केला.   

अमरावती, मालेगाव, नांदेड येथे बंददरम्यान समाजकंटकांनी दगडफेक आणि तोडफोड केली. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. नांदेड येथे पोलिसांनी प्लास्टिक गोळ्या झाडल्यानंतर हिंसक जमाव पांगला.

मालेगावात दुकाने बंद करण्यासाठी दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांना पिटाळण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरासह सौम्य लाठीमार केला. नांदेड येथे समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत एक पोलीस निरीक्षक जखमी झाला, तसेच शीघ्र कृती दलाच्या एका जवानाच्या पायाच्या नसा तुटल्या तर दुसऱ्या एका जवानाच्या डोक्याला जबर मार लागला आहे. अमरावती येथे  मोर्चादरम्यान काही दुकानांवर दगडफेक करण्यात आली.  मुंब्रा शहरातही बंद पाळण्यात आला.

पोलिसांना दक्षतेचे आदेश

नांदेड, अमरावती, मालेगाव आदी शहरांमधील हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर दक्ष राहण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले.  नागरिकांनी शांतता आणि संयम बाळगण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State strike turns violent in protest of tripura incident akp
First published on: 13-11-2021 at 01:37 IST