जालना : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान दगडफेक झाली. या दगडफेकीत वरिष्ठ अधिकाऱ्याच्या गाडीच्या तसेच कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. या प्रकरणी तालुका जालना पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून मोर्चातील दहा जणांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा >>> जायकवाडीत पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा; स्थगितीची मागणी फेटाळली

शहरातील महात्मा गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचल्यावर नेतेमंडळींची भाषणे झाली. जिल्हाधिकाऱ्यांना मोर्चेकऱ्यांचे निवेदन देऊन मोर्चाची सांगता होणार होती. जिल्हाधिकाऱ्यांनी तेथे यावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. परंतु काही काळ वाट पाहूनही जिल्हाधिकारी किंवा अन्य अधिकारी आले नाहीत. त्यानंतर मोर्चेकरी संरक्षक भिंत ओलांडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात दाखल झाले. तेथे उभ्या असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या गाडीच्या काचा त्याचप्रमाणे  प्रशासकीय इमारतीच्या खिडक्यांच्या काचाही फोडण्यात आल्या. या घटनेनंतर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येऊन मोर्चेकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून पांगविण्यात आले.

हेही वाचा >>> दूध दरवाढ बैठक निष्फळ; दरवाढीचा शासन आदेश अमान्य; २४ नोव्हेंबर रोजी दूध उत्पादकांचे आंदोलन 

धनगर समाजाच्या मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी आपण मंगळवारी पूर्णवेळ कार्यालयात होतो. निवेदन स्वीकारण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार गेटवर गेले होते. परंतु तेथे काहीजण आक्रमक झाल्याने ते परतले. त्यानंतर मोर्चेकऱ्यांचे निवेदन आपण स्वीकारले आहे. आदल्या दिवसापासून प्रशासन मोर्चेकऱ्यांच्या संपर्कात होते. मंगळवारचा प्रकार काही गैरसमजातून घडला. सामंजस्य आणि सहकार्याची भूमिका प्रशासनाची आहे. शांतता राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी, जालना</p>