सांगली : दोन तरूणांमधील वादातील वादग्रस्त वक्तव्यावरून मिरजेत मंगळवारी रात्री दोन समाजात तेढ निर्माण झाली होती. या प्रकारातील संशयित तरूणाच्या घरासह येथील लक्ष्मी मार्केटमध्ये दगडफेकीच्या घटना घडल्या. हिंसक जमावाने काही दुकानांचे नुकसान करत ती बंद करण्यास भाग पाडले. दरम्यान जमाव हिंसक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीसांनी लाठीमार करत जमाव पांगवला. या घटनेमुळे शहरातील वातावरण तणावाचे असले तरी परिस्थिती आता नियंत्रणात आहे. या घटनेनंतर मिरजेसह परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील नदीवेस भागात मंगळवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. या वेळी दोन तरुणांमध्ये एकमेकांच्या धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये होत वाद घडला. याचे पडसाद लगेच उमटत जमाव एकत्र आला. एकत्र आलेल्या तरूणांच्या गटाने संशयित तरूणाच्या घरावर दगडफेक केली. संतप्त झालेला हा जमाव पोलीस ठाण्यात जात त्याने संबंधित संशयितावर कठोर कारवाईची मागणी केली. यातूनच काही तरूणांनी मार्केट परिसरात दुचाकीवरून फिरत दुकाने बंद करण्याचे आवाहन केले.
यामुळे मार्केट परिसरात असणार्या खाद्यविक्रेत्यांची चांगलीच धावपळ उडाली. मार्केट परिसरात असलेल्या फलकाची नासधूस करण्यात आली. या दरम्यान, शास्त्री चौकातील फलकांचीही मोडतोड झाली. यातून दोन्ही बाजूचे जमाव एकत्र येत ते संतप्त झाले. हे दोन्ही गट समोरासमोर आल्याने परिस्थिती चिघळण्याची भीती लक्षात घेत पोलिसांनी जादा कुमक मागून घेतली. हा जमाव हिंसक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीसांनी लाठीमार करत जमाव पांगवला.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधिक्षक कल्पना बारवकर यांनीही मिरजेत धाव घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणिल गिल्डा, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, ग्रामीणचे निरीक्षक अजित सिद तसेच महसूल विभागाचे उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अपर्णा मोरे- धुमाळ, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील आदी वरिष्ठ अधिकारी रात्रीच मिरजेत दाखल झाले होते.
वादामुळे शहरातील स्थिती रात्रभर तणावाची होती. संशयिताला पोलीसांनी रात्रीच ताब्यात घेतले असून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आज करण्यात येणार आहे.
या घटनेमुळे शहरातील वातावरण तणावाचे असले तरी परिस्थिती आता नियंत्रणात आहे. मुख्यालयातील अतिरिक्त पोलीस बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला असून लक्ष्मी मार्केटमध्ये बुधवारी सकाळीही पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मिरजेसह परिसरात तणाव असला तरी परिस्थिती नियंत्रणात आहे.
दैनंदिन व्यवहार सकाळपासून नित्याप्रमाणे सुरू झाले आहेत.
दरम्यान, मिरजेला २००९ मधील जातीय दंगलीची पार्श्वभूमी असल्याने मिरजेत दंगल उसळल्याच्या अफवा वेगाने पसरल्या. पोलीस अधिक्षक श्री. घुगे यांनी हा वाद दोन तरूणामधील असून याला धार्मिकतेचा रंग कोणी देउ नये असे आवाहन करत अफवावर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन समाज माध्यमातून केले. दरम्यान शहरातील तेढ निर्माण करणारे फलक महापालिकेने रात्रीच उतरवले असून काही स्वागत कमानीचे सांगाडे अद्याप कायम आहेत. महापालिकेच्या परवानगी विना यातील अनेक फलक उभारण्यात आले होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या फलकावर राजकीय कार्यकर्त्यांची छायाचित्रे असल्याने महापालिका प्रशासनानेही या अवैध फलकांवरील कारवाई टाळल्याची चर्चा शहरात सुरू आहे.