मालेगाव, नांदेड, अमरावतीत दगडफेक; त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ सुरू होता बंद!

नांदेडमध्ये दगडफेकीत दोन पोलीस जखमी झाले आहेत

file photo

राज्यातील काही शहरात दगडफेक आणि तोडफोडीच्या घटना घडत आहेत. त्रिपुरात मुस्लीम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराविरोधात काढलेल्या रॅलीला आज हिंसक वळण लागले. राज्यात मालेगाव, नांदेड, अमरावतीत मुस्लीम समाजाने काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. नांदेडमध्ये दगडफेकीत दोन पोलीस जखमी झाल्याचे शक्यता आहे.

त्रिपुरात कथित मुस्लीम समाजावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात प्रशासनाला निवेदन देण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी जमावाने पोलिसांवर दगडफेक केली त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यावेळी दंगल नियंत्रक पथकाला तैनात करण्यात आले होते. गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, “राज्यात तीन ठिकाणी हिंसक घटना समोर आल्या आहेत. मी अधिकाऱ्यांशी बोललो आहे. यावर मी कठोर कारवाईचे आदेश देणार आहे. काही समाजकंटक लोकांचे माथी भडकावून अशा घटना घडवत असतात. याच्या मुळाशी आम्ही जाऊ, ही हिंसा ज्यांनी भडकवली त्यातल्या कुणालाही आम्ही सोडणार नाही. दरम्यान, पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत”

मालेगाव शहरात तणावसदृश परिस्थिती

त्रिपुरा येथे मुस्लीम समाजातील नागरिकांवर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी मालेगावत पाळण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. यावेळी समाजकंटकांना पिटाळून लावण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या प्रकारामुळे शहरात तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

सुन्नी जमेतुल उलमा, रजा ॲकेडमी आदी संघटनांनी बंदची हाक दिली होती. शहरातील पूर्व भागात शांततेत बंद पाळण्यात आला होता. मात्र दुपारनंतर काही तरूणांच्या जमावाने येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील दुकानांवर दगडफेक करीत दुकाने बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली होती.

या प्रकाराची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधिक्षक लता दोंदे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धुसर आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घटनास्थळी पाचारण झालेल्या शीघ्र कृती दलाच्या वाहनावरदेखील जमावाने दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. या प्रकारानंतर शहरात तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अफवांना ऊत आला होता.

यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत अश्रुधुराचा मारा केला. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी शहरातील पूर्व पश्चिम भागाला जोडणारे रस्ते बॅरिकेट्स लावून वाहतुकीसाठी बंद केले आहेत. जमावाच्या दगडफेकीत काही पोलीस किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे.

हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक – फडणवीस

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, “त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून आज अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत. राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी!”

त्रिपुरातील पडसाद इथे कसे उमटू शकतात? – चंद्रकांत पाटील 

चंद्रकांत पाटील म्हणाले, “मालेगावातील तणाव परिस्थिती चिघळू नये, त्रिपुरातील पडसाद इथे कसे उमटू शकतात? दुसऱ्या राज्यातील घटनेवर मालेगावात प्रतिक्रिया उमटण्याचे कारण नाही स्वातंत्र्याच्या आधीपासून असे घडत आलं आहे. जगात कुठे काही घडलं तर त्याची प्रतिक्रिया देशात उमटते. त्रिपुरामध्ये मशीद का पाडली, ते अनधिकृत बांधकाम होत की नाही माहीत नाही. परंतु तिथल्या घटनेचे मालेगावात पडसाद उमटण्याचे कारण नाही.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Stone throwing in malegaon nanded amravati violent turn to the front drawn by the muslim community srk

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या