राहाता : केंद्र सरकारची आंतरजातीय विवाह योजना बंद झाली. मी त्या खात्याचा राज्यमंत्री मात्र मलाच याबाबत माहीत नाही. ही योजना बंद करणे योग्य नाही. कॅबिनेट मंत्र्यांनी निर्णय घेताना विचारविनिमय करायला हवा होता. माझी नाराजी मी त्यांच्याकडे व्यक्त करणार आहे. ही योजना सुरू राहावी ही माझी भूमिका आहे, असे स्पष्ट मत केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीत बोलताना व्यक्त केले.

सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळविण्यात आला, यावर बोलताना आठवले म्हणाले, सामाजिक न्याय खाते गोरगरिबांना न्याय देणारे खाते आहे. समाजकल्याण विभागाचा निधी न देता इतर विभागांचा निधी द्यावा. अशा पद्धतीने निधी वळवणे योग्य नाही. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. कर्नाटकाच्या धर्तीवर सामाजिक न्याय विभागाचा निधी न वळवण्याचा कायदा करावा.

शरद पवार ‘एनडीए’सोबत येतील असेही वाटत नाही. मात्र त्यांनी एनडीएसोबत आले पाहिजे. समाजवादी विचारांचे अनेक नेते अटलबिहारींच्या नेतृत्वात एनडीएत आले होते. शरद पवारांनी देखील यायला हरकत नाही. शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर राष्ट्रवादी आणखी मजबूत होईल. परंतु शरद पवार – अजित पवार एकत्र येतील असे वाटत नाही, असेही स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

‘पीओके’साठी युध्द गरजेचे

भारत-पाकिस्तान युद्धाबाबत विचारलेल्या प्रश्नावर आठवले म्हणाले, पहलगाम हल्ला देशाच्या अस्मितेला धक्का आहे. आपल्या सैन्याने पाकिस्तानातले आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. आपण टिपून टिपून आतंकवादी मारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत कणखर भूमिका घेतली. ही युद्धबंदी म्हणजे अल्पविराम आहे. पाकव्याप्त काश्मीर भारताला मिळावा, ही आपली भूमिका असून पीओके ताब्यात घ्यायलाच हवे. पंडित नेहरूंनी पीओके ताब्यात घ्यायला हवा होता. मात्र तसे झाले नाही. मोदींच्या नेतृत्वात आपण सक्षम आहोत. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले म्हणून युद्ध थांबवले नाही. पीओके ताब्यात घेण्यासाठी युद्ध गरजेचे.

भाजप मंत्र्यांची वक्तव्ये योग्य नाहीत

आम्ही बुद्धाला मानणारे, मात्र स्वतःच्या संरक्षणासाठी युद्ध करणे हिंसा नसते. युद्ध व्हावे आणि पीओके ताब्यात घ्यावे ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. एकदा सोक्षमोक्ष लावणे आवश्यक आहे. विरोधकांनी या विषयात राजकारण आणू नये. कर्नल सोफियाबाबत भाजपच्या मंत्र्यांनी अशी वक्तव्य करणे योग्य नाही. विजय शाह यांनी माफी मागितली आहे. कर्नल सोफिया कणखर महिला आहेत.

‘आरपीआय’ला जागा मागणार

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आम्ही महायुतीचे घटक म्हणून एकत्र निवडणूक लढवणार आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार येण्याअगोदरपासून आम्ही भाजपसोबत आहोत. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेत आरपीआयला जागा मिळाव्यात अशी मागणी रामदास आठवले यांनी केली.