अलिबाग : रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतर्गत वादळ अखेर शमले आहे. माजी आमदार सुरेश लाड यांची नाराजी दूर करण्यात खासदार सुनील तटकरे यांना यश आले आहे. मात्र जिल्हाध्यक्ष पदाचा लाड यांनी दिलेला राजीनामा पक्षाने स्वीकारला असून लवकरच नवीन जिल्हाध्यक्षाची निवड केली जाईल अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 वरसोली येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृहात पार पडलेल्या कार्यकारीणीच्या बैठकीनंतर लाड यांची नाराजी दूर करण्यात आली असून लवकरच त्यांच्यावर पक्षाकडून विभागीय जाबाबदारी सोपविली जाईल असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. लाड कालही राष्ट्रवादीत होते आजही आहेत आणि उद्याही राहतील, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांत ते पक्षाचे पुर्णवेळ काम करतील असेही तटकरे यांनी यावेळी जाहीर केले.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या रायगड जिल्हा दौऱ्यादरम्यान सुरेश लाड यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. कर्जत, पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड मतदारसंघातील कार्यकर्ता संवाद मेळाव्यांना ते गैरहजर राहिले होते. यानंतर ते भाजपात जाणार असल्याच्या वावडय़ादेखील उठल्या होत्या. अनेक दिवस ते संपर्कक्षेत्राच्या बाहेर होते. या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी सुरेश लाड यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी केली होती.

यानंतर अलिबाग येथे पार पडलेल्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीला सुरेश लाड यांनी हजेरी लावली. पक्ष देईल ती जबाबदारी यापुढे पार पाडीन असेही लाड यांनी या वेळी जाहीर केले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रावादी काँग्रेसमधील वादळ आता क्षमले असल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळाले.

कोंढाणे धरणाचे पाणी कर्जतला मिळावे 

 कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरणाचे काम सध्या सुरू आहे. हे धरण भाजपच्या राजवटीत सिडकोला देण्याचा निर्णय झाला होता. धरणाचे पाणी महामुंबई क्षेत्रासाठी राखीव ठेवण्यात येणार होती. यास लाड यांनी आक्षेप घेतला आहे. धरणाचे पाणी हे कर्जतवासीयांसाठीच वापरले जावे. यासाठी धरण राज्याच्या जलसंपदा विभागाने ताब्यात घ्यावे अशी मागणी त्यांनी केली. आधीच मोरबे धरणामुळे कर्जतवासीयांवर अन्याय झाला आहे. धरण असूनही धरणाचे पाणी स्थानिक गावांना मिळत नाही. त्यामुळे कोंढाणे धरणाचे पाणी हे

कर्जतसाठीच वापरले जावे अशी मागणी लाड यांनी केली आहे. दोन वर्षांत यासंदर्भात निर्णय झाला नाही. त्यामुळे लाड नाराज होते पण जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या दालनात लवकरच यासंदर्भात निर्णय होईल अशी ग्वाही तटकरे यांनी या वेळी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Storm raigad nationalist congress party subsided success resolving suresh lad grievances ysh
First published on: 04-05-2022 at 00:02 IST