तालुक्यातील पेडगाव येथे जि. प. शाळेवरील टिनपत्रे वादळी वा-याने उडून गेल्यामुळे विद्यार्थ्यांवर छताविनाच शिक्षण घेण्याची वेळ ओढवली आहे. शाळा खोलीची दुरुस्ती करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी केली आहे.
जिल्ह्यात ३ दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह गारपीट होऊन शेतकरीवर्गाचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले रब्बी पीक मातीला मिळाले. प्रशासनाची नुकसानीच्या पंचनाम्याची लगबग सुरू आहे. पेडगाव येथील शाळेवरील टिनपत्रे उडून गेल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच अडचण झाली आहे. शिवाय शाळेच्या िभतीचा काही भाग कोसळला आहे. त्यामुळे शाळेचे सुमारे ३ लाखांवर नुकसान झाले.
या शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यास जागाही नाही. त्यामुळे बाहेर व्हरांडय़ात बसून उघडय़ावर शिक्षणाचे धडे घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजकुमार ठाकूर यांनी शाळेच्या नुकसानीचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर केला. यात शाळेची एक खोली मतदान केंद्रासाठी दिली होती. त्यामुळे शाळा खोलीची तातडीने दुरुस्ती व्हावी, असे अहवालात म्हटले आहे.