दिगंबर शिंदे
सांगली : पै-पाहुण्यांची रेलचेल असलेल्या सीमेपलीकडील कर्नाटकमध्ये भाजपला हरवून काँग्रेसची सत्ता आल्यानंतर जिल्ह्यात महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये नवा जोष आला आहे. एकत्रित काम केले तर जिल्ह्यातील आठही जागा आपण पुन्हा जिंकू शकतो हा आत्मविश्वास काँग्रेसमध्ये निर्माण झाला असूून याची सुरुवात जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून करण्याची तयारी सुरू झाली आहे. यातच सावध झालेल्या भाजपनेही पक्षीय पातळीवर खांदेपालटाची तयारी सुरू केली आहे.
कर्नाटकातील कागवाड, अथणी, विजयपूर, बबलेश्वर आणि इंडी या पाच मतदारसंघांशी जिल्ह्याचा रोजचा थेट संपर्क आहे. पै-पाहुणे तर आहेतच, पण याचबरोबर काहींची शेती कर्नाटकात आहे. बाजारपेठेच्या निमित्ताने अनेक नागरिक ये-जा करीत असतात. मिरज तर वैद्यकीय केंद्र असल्याने कर्नाटकातील अनेक गावांतील लोकांचा मिरजेशी संपर्क आहे, तर सांगली बाजार समितीमध्ये शेतीमाल विक्रीसाठी मोठय़ा प्रमाणात कर्नाटकातून येत असतो. गूळ, हळद, मका यासाठी सांगलीची बाजारपेठ तर कर्नाटकला महत्त्वाची आहे. तसेच सीमेवरील साखर कारखाने अगदी मिरज, जतसह विटा, कडेगाव परिसरातून उसाची उचल करीत असतात. याशिवाय मोठय़ा प्रमाणात अकुशल कामगारांची रोजची ये-जा मिरजेत आहे.
कर्नाटकातील राजकीय घडामोडींचा परिणाम जिल्ह्यातील मिरज, जत आणि सांगली या तीन मतदारसंघांवर थेट होऊ शकतो, तर याचे पडसाद अन्य मतदारसंघांमध्ये उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते प्रचारासाठी सीमावर्ती भागात तळ ठोकून होते. पालकमंत्री सुरेश खाडे, आ. जयंत पाटील, आ. डॉ. विश्वजित कदम, आ. विक्रम सावंत, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, राज्य कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमणगोंडा रवी पाटील आदी मंडळींनी मराठी भाषिक भागात प्रचारासाठी योगदान दिले. इनामदार आणि रवी पाटील यांच्यावर तर भाजपने दोन मतदारसंघांची प्रचाराची धुरा सोपवली होती. सीमावरील मतदारसंघांसाठी दोन्ही काँग्रेससह भाजपला रसद पुरवठा सांगली, मिरज आणि जतमधून झाला.
यामुळे सीमेपलीकडे घडणाऱ्या राजकीय घटनांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम जिल्ह्यातील मतदारांवर होणार हे स्पष्ट आहे. कर्नाटकात काँग्रेसला विजय मिळताच काँग्रेसने सांगली, मिरज, जतसह विटा, पलूस, कडेगाव आदी ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करीत विजयोत्सव साजरा केला. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयामुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा मिळाली असली तरी ही ऊर्जा कायम राखण्यासाठी नेतेमंडळींनी प्रयत्नशील राहण्याची गरज आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला सांगली जिल्हा भाजपला सुकर करण्यात दोन्ही काँग्रेसमधील कुरघोडीचे राजकारण कारणीभूत आहे. महाविकास आघाडीच्या दृष्टीने सांगली बाजार समिती निवडणुकीत कोणाचा कार्यक्रम होणार नाही याची दक्षता नेतेमंडळींनी घेतल्याने भाजपप्रणीत पॅनेल पराभूत करून बाजार समितीची सत्ता कायम राखण्यात यश आले.
कर्नाटकातील निवडणूक निकालानंतर भाजपही सावध झाला आहे. नवीन कार्यकारिणी जाहीर करीत असताना जिल्ह्यातील एका नेत्याला संघटनमंत्री करण्यात आले असून उपाध्यक्ष पदासाठी जिल्ह्याला संधी दिलेली नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकारी नियुक्ती करीत असताना सातारा, कोल्हापूरला उपाध्यक्ष पद दिले. मात्र, यापूर्वी जिल्ह्यातील नीता केळकर, शेखर इनामदार हे उपाध्यक्ष असताना त्यांची पदावनती करीत कार्यकारिणी सदस्य पदावरच बोळवण केली आहे. आता ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना दोन वेळा संधी देण्यात आली. यावेळी त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीपासून दूर राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका, लोकसभा आणि विधानसभा या निवडणुका येत्या एक-दीड वर्षांतच होणार असल्याने जिल्हाध्यक्ष पदासाठी कोणाला संधी दिली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशीकांत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे आदींच्या नावांची चर्चा पक्षीय पातळीवर होत आहे. या महिनाअखेर या नियुक्त्या होतील, त्यानंतरच भाजपची रणनीती समोर येईल.