Art Director Nitin Desai Commits Suicide : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक आणि निर्माते नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने मराठीसह हिंदी कला विश्वाला मोठा धक्का बसला आहे. नितीन देसाई यांनी कर्जत येथील एन. डी. स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिंदी, मराठी चित्रपटांसाठी आणि मालिकांसाठी कला दिग्दर्शनाचं काम केलं होतं. त्याचबरोर अनेक इतिहासकालीन मालिकांमध्येही त्यांनी कलादिग्दर्शन केलं होतं. राजा शिवछत्रपती या मालिकेची निर्मिती देसाई यांनीच केली होती. नितीन देसाईंच्या आत्महत्येमुळे चित्रपटसृष्टीसह राजकीय विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, नितीन देसाई यांच्या निधनानंतर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मुनगंटीवार म्हणाले, अतिशय सुंदर कलाकृती निर्माण करणाऱ्यांपैकी एक म्हणजे नितीन देसाई. महाराष्ट्राचा गौरव वाढेल, अशा पद्धतीने त्यांनी एकेक सेट उभा केला आहे. प्रचंड आविष्कार करण्याची क्षमता त्यांच्यात होती. त्यांची कल्पनाशक्ती अतिशय उत्तम होती. अनेक बैठकांमध्ये मी त्यांच्याबरोबर बसलोय. मी त्यांच्या मानतल्या कल्पना बघितल्या, ऐकल्या आहेत. सगळं काही अप्रतिम होतं.

हे ही वाचा >> Nitin Desai Suicide: नितीन देसाईंवर होतं तब्बल २४९ कोटींचं कर्ज; एन. डी. स्टुडिओचीही होणार होती जप्ती!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, नितीन देसाईंची आत्महत्या मनाला चटका लावून गेली. ही खूप दुर्दैवी आणि दुःखदायक घटना आहे. असं कोणी करू नये. नितीन देसाईंनी आत्महत्या का केली? तर मला कारण सांगण्यात आलंय की, त्यांची काहीतरी आर्थिक अडचण होती. परंतु, त्यांच्यात क्षमता होती. ते त्या आर्थिक अडचणींवर मात करू शकले असते. पोलीस तपासात सत्य समोर येईल. तसेच इतरांच्या वक्तव्यांमधून समोर येईल. परंतु हे सगळं दुःखदायक आहे.