परीक्षांमध्ये झालेल्या घोटाळ्यांवरून सध्या राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अनेक बड्या पदाधिकाऱ्यांकडे पैशांचं घबाड सापडत असताना हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्याच्या विधानसभेत देखील त्याचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. विरोधकांनी परीक्षांच्या मुद्द्यावरून सरकारला घेरत परखड शब्दांत टीकास्त्र सोडलं आहे. याचदरम्यान विधानसभेत बोलताना भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारी नोकरीसाठीच्या परीक्षांसाठी घेतल्या जाणाऱ्या शुल्काच्या रकमेवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तसेच, राणीबागेतील पेंग्विनच्या मुद्द्यावरून देखील खोचक टीका केली.

कोणत्या मंत्र्याचा मुलगा क वर्गातली नोकरी करेल?

सरकारी नोकरीसाठीच्या परीक्षेचं शुल्क आकारण्यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. “पेंग्विनवर कोट्यवधींचा खर्च होत असताना परीक्षेसाठी गरीब विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारलं जात आहे. खुल्या प्रवर्गासाठी ६०० रुपये आणि एससी-एसटी-ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून ४०० रुपय शुल्क आकारलं जात आहे. गरीब आहेत हो ते. कुणा मंत्र्याचा मुलगा जाणार आहे का एसटी किंवा आरोग्य विभागात नोकरीसाठी? “, असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत बोलताना केला.

दरम्यान, यावेळी त्यांनी सभागृहातील आमदारांना उद्देशून आव्हान दिलं. “आहे का इथे एक माई का लाल, जो म्हणेल की माझा मुलगा क्लास थ्री ची नोकरी करेल? त्या गरीबाकडून पैसे घेतले. ४ लाख ५ हजार १६३ विद्यार्थी क श्रेणीतील नोकरीसाठी आणि ४ लाख ६१ हजार ४९७ विद्यार्थी ड श्रेणीतील नोकरीसाठी अशा ८ लाख ६६ हजार ६६० विद्यार्थ्यांकडून पैसे घेण्यात आले. पण परीक्षा घेताना सरकार मात्र पूर्ण नापास झालंय”, असं मुनगंटीवार म्हणाले.

पेंग्विन प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा!

परीक्षा शुल्कावरून निशाणा साधताना पेंग्विनसाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. “मला एक गरीब विद्यार्थी असं म्हणाला की मला नोकरीच मिळत नाही. आत्ता मी १०० रुपये रोजीनं काम करतो. मी म्हटलं चांगले दिवसही येतील ना. तो म्हणाला साहेब मला तर वाटतं की खरंच मरावं आणि राणीबागेच्या पेंग्विनच्या रुपाने जन्म घ्यावा. पण मी विचारलं, असं तुला का वाटतं? तो मला हिशोब सांगत होता, की त्या पेंग्विनवर रोज २० हजार रुपये खर्च होतात. एका तासाला ८३३ रुपये म्हणजे महिन्याला ६ लाख रुपये खर्च होतात”, असं मुनगंटीवार म्हणाले.

“दिलीप वळसे पाटील, अहो तुमच्यापेक्षा पेंग्विन….”; सुधीर मुनगंटीवारांची विधानसभेत शाब्दिक फटकेबाजी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुनगंटीवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा!

दरम्यान, यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवारांनी महाविकासआघाडी सरकार जनतेनं निवडून दिलेलं नाही, असं सांगताना खोचक टोला लगावणारा एक किस्सा सांगितला. “नानाभाऊ, हे सरकार जनतेनं निवडून दिलेलं नाही. आमच्या भागात एक मुलगा होता. त्याला पोलीस पकडायला आले. त्याचे वडील म्हणाले, माझ्या मुलाला का पकडायला आले? म्हणे याने बाजूच्या एमबीबीएस विद्यार्थ्याची मार्कशिट घेऊन स्वतं:चं नाव आणि नंबर लिहिला. मग वडिलांनी विचारलं, तू त्याची मार्कशिट का चोरली. म्हणे मी शब्द दिला होता एक दिवस डॉक्टर होऊन दाखवीन, पण त्यासाठी मार्कशिटची चोरी करायची का. तू वडिलांना शब्द दिला होता तर मेहनत कर, परिश्रम कर, कष्ट कर”, असं ते म्हणाले.