Sudhir Mungantiwar on ministerial post: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे ते नाराज असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले गेले. अशातच त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सुमारे दीड तास चर्चा केली, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. आज ते विधीमंडळात आले होते. यावेळी त्यांनी पहिले दोन दिवस अधिवेशनाला अनुपस्थिती का लावली? याचा खुलासा केला. तसेच मंत्रिपद मिळाले नाही म्हणून आपण नाराज नसल्याचे सांगितले. तत्पूर्वी १३ डिसेबंर पर्यंत आपल्याला मंत्रीपद मिळणार असल्याचे ठरले होते, असाही गौप्यस्फोट त्यांनी केला.

माध्यमांशी बोलत असताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “मी नाराज नाही. तसे कारणही नाही. २३७ आमदारांपैकी ४२ आमदारांना मंत्रिपदाची संधी प्राप्त झाली आहे. विधानपरिषदेचा एक आमदार सोडला तर विधानसभेतील १९६ आमदारांना मंत्री होण्याची संधी मिळालेली नाही. त्यातलाच मी एक आहे. त्यामुळे नाराज होण्याचे काहीही कारण नाही. कोणतेही पद शाश्वत नाही. पदे मिळतात आणि जातात. भरती-ओहोटी सुरूच राहते. त्यामुळे मी पक्षाचे काम करत राहणार आहे.”

हे वाचा >> नाराज भुजबळांची पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी चर्चा, पुढची योजना ठरली? स्वतः माहिती देत म्हणाले…

वक्त आयेगा, वक्त जायेगा

“आता माझ्याकडे पद नाही, असे म्हणता येणार नाही. मी आमदार आहे. त्यातूनही मी जनतेची कामे करू शकतो. आजवर माझ्या मतदारसंघात जेवढी काम मी केलीत त्याचे कौतुक देश करतोय. ‘वक्त आयेगा, वक्त जायेगा’, पण आपले काम करत राहिले पाहीजे. आपल्या एखाद्या कृतीतून पक्षाचे नुकसान होता कामा नये. या पक्षासाठी हजारो लोकांनी त्याग केला आहे. अशा पक्षाला नुकसान होईल, अशी कोणतीही कृती कार्यकर्त्यांनी करू नये”, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

१३ डिसेंबर पर्यंत माझे मंत्रिपद निश्चित होते

मंत्रिपदाबाबत बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याअगोदर माझे नाव त्या यादीत आहे, हे मला सांगण्यात आले होते. १३ डिसेंबरच्या सायंकाळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माझ्याबरोबर दोन-अडीच तास बसून चर्चा करत होते. तेव्हाही त्यांनी मला माझे नाव मंत्रिपदाच्या यादीत असल्याचे सांगितले होते. पण १५ डिसेंबर रोजी काय झाले याची मला कल्पना नाही. कोणत्या पेनची शाई होती, हे मला माहीत नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

म्हणून अधिवेशनाला उपस्थित नव्हतो

अधिवेशनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी सुधीर मुनगंटीवार हे कामकाजामध्ये उपस्थित नव्हते. त्यावर बोलताना ते म्हणाले की, पहिल्या दिवशी फार काही महत्त्वाचे कामकाज नव्हते. मंत्री म्हणून अनेक फाइल्स हाताळाव्या लागतात. अधिकाऱ्यांकडून चर्चेतील मुद्द्यांवर ब्रीफिंग केले जाते. तसेच दुसऱ्या दिवशी राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वेळ द्यायचा होता. त्यामुळे आपण विधिमंडळात आलो नाही. आपण कोणत्याही परिस्थितीत नाराज नाही. आपण नाराज राहणारे व्यक्ती नाही असे मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा नमूद केले.