Sudhir Mungantiwar On Maharashtra Cabinet : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. महायुती सरकारमधील आठ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याचीही चर्चा होती. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या जागी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा देखील होती. मात्र, त्या सर्व चर्चा महायुतीच्या नेत्यांनी फेटाळून लावल्या होत्या.
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना संधी मिळालेली नाही. त्यामुळे अनेकदा सुधीर मुनगंटीवार यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्याचंही पाहायला मिळालं. तसेच सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून का डावललं? याबाबतही अनेक तर्कवितर्क लावले गेले. दरम्यान, आता सुधीर मुनगंटीवार यांना मंत्री पदाच्या संदर्भात एक प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराची चर्चा रंगली आहे. ‘मी मंत्री पदासाठी देवाकडे प्रार्थना करत नाही’, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?
“कोणत्याही पक्षात इनकमींगसाठी विरोध असण्याचं काहीही कारण नाही. मात्र, हे देखील खरं आहे की पक्ष म्हणजे शनि शिंगणापूरमधील घरांसारखा बिना दरवाज्याचाही असता कामा नये. ही काळजी घेणं गरजेचं आहे. पक्षाला या माझ्या सूचना नाहीत तर या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत”, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
मंत्रिपदाबाबत मुनगंटीवार काय म्हणाले?
आज तुम्ही त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं, देवाकडे काय प्रार्थना केली? आगामी काळात मंत्रिमंडळात लवकर सहभागी होण्याबाबत देवाकडे काही प्रार्थना केली का? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी सुधीर मुनगंटीवार यांना विचारला. यावर उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “मी मंत्री पदासाठी देवाकडे प्रार्थना करत नाही. यामागचं साध कारण आहे. देवाने एवढा आनंद आणि समाधान दिलं आहे. उद्या मंत्रिपदावर जायचं, चुकून पुन्हा आपल्या तोंडातून काही वक्तव्य निघायचं आणि चार दिवस तेच टिव्हीवर पाहायचं. त्यापेक्षा जेथे आहे तेथेच समाधानी आहे”, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.