महाराष्ट्रात शिवसेनेचा शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार येऊन आता उद्या (३० जून) एक वर्ष पूर्ण होईल. तरी अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. परंतु लवकरच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा आहे. जून महिन्याच्या पहिला आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी चर्चा होती, परंतु तसं काही झालं नाही. त्यानंतर नव्या सरकारला एक वर्ष पूर्ण होण्याच्या मुहुर्तावर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी चर्चा रंगू लागली. परंतु त्या चर्चादेखील फोल ठरल्या आहेत. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जनतेसह भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षातील अनेक इच्छूक आमदारांना प्रतीक्षा आहे. परंतु त्या दृष्टीने पावलं उचलेली दिसत नाहीत.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल असं बोललं जात आहे. याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सांस्कृतिक मंत्री आणि महाराष्ट्र भाजपाचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना प्रश्न विचारला. त्यावर मुनगंटीवार यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. मुनगंटीवार म्हणाले, साधारणतः मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासंदर्भात निर्णय झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्याला निश्चितपणे माहिती देतील. यासंदर्भात मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही आणि तो माझा अधिकरही नाही.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करून निर्णय घेतील. मंत्रिमंडळाचं आकारमान, मंत्र्यांची नाव आणि खाती निश्चित करतील. नागरिक म्हणून विचार केला तर मला व्यक्तिगत असं वाटतं की विधानसभेच्या अधिवेशनाच्या अगोदर हा विस्तार होऊ शकतो. मी निश्चितपणे सांगू शकत नाही, मी केवळ शक्यता सांगतोय.
हे ही वाचा >> ‘त्या’ जाहिरात प्रकरणामुळे एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांमध्ये मतभेद? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…
मंत्रिमंडळ विस्ताराबात देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अलिकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांच्याशी चर्चा केल्याचं सांगितलं जात होतं. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना औरंगाबादेत प्रसारमाध्यमांशी बोलत असताना माध्यमांच्या प्रतिनिधींनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत प्रश्न विचारला होता, तसेच याबाबत अमित शाह यांच्याशी काय चर्चा झाली असाही प्रश्न विचारला. यावर फडणवीस म्हणाले होते की, “मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा अमित शाहांबरोबर झालेली नाही. मात्र आम्हाला मंत्रिमंडळ विस्तार करायचा आहे आणि योग्यवेळी आम्ही तो करू.”