विधीमंडळाचं अधिवेशन सोमवारपासून (१७ जुलै) सुरु झालं आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असून आजही विधान परिषदेत सभापती पदावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. काल पहिल्या दिवशी शेकापचे जयंत पाटील यांनी विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांच्या पदावर आक्षेप घेतला. सभापती महोदया तुमच्यावर आक्षेप आहे असं ते म्हणाले. हे सभागृह आपण चालवत असताना आपण ज्या पदावर बसतो, त्याचा पक्ष नसतो असं पाटील म्हणाले. आम्ही तुमच्याविरोधात कोर्टात जाणार नाही, कारण ते तुमच्यासाठी खूप सोपं आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, विधान परिषदेत आज पुन्हा एकदा जयंत पाटील यांनी नीलम गोऱ्हे यांच्या अपात्रतेचा मुद्दा उपस्थित केल्यावर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि सचिन अहिर आक्रमक झाले. तर उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अहिर आणि परब यांच्या शाब्दिक हल्ल्याला उत्तर दिलं. सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले, सभापती आणि उपसभापती पदावर हरकत घेतलीय त्यावर आपण चर्चा करतोय. ही चर्चा गुणवत्तेवर आहे. कायदेविषयक बाबींवर आहे. विधान परिषदेच्या नियमावर आहे. त्यात तुम्ही मला मत मांडण्यापासून रोखू शकत नाही.

यावर सचिन अहिर आणि अनिल परब अधिक आक्रमक झाले. त्यामुळे मुनगंटीवार यांना बोलता येत नव्हतं. तेव्हा मुनगंटीवार म्हणाले, सचिनजी, अहो सचिनजी, मी आत्ता इथं भविष्यवाणी करतो, एक दिवस असा येईल की हे सचिन अहीरसुद्धा भाजपाबरोबर येतील. मी गंमत नाही सांगत. मी हे खूप गंभीरपणे बोलतोय.

हे ही वाचा >> किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण, देवेंद्र फडणवीसांनी केली ‘ही’ मोठी घोषणा; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुनगंटीवार म्हणाले, अनिल परबांची अवस्था महाभारतातल्या अश्वत्थाम्यासारखी नाही झाली तर माझं नाव बदलून टाका. गुणवत्तेच्या आधारे निर्णय देताना माझे चार महत्त्वाचे मुद्दे आहेत. सभागृहात कुठलीही चर्चा व्यक्तीगत रोष, व्यक्तीगत राग आणि कुठलेही हेतू ठेवून करता येत नाही. इथे मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे.