अकोले – अगस्ती सहकारी साखर कारखाना २०२५ – २०२६ च्या गळीत हंगामासाठी उसाला प्रति टन तीन हजार रुपये भाव देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी केली. या वर्षी कारखाना साडेतीन लाख टन उसाचे गाळप करेल, असे त्यांनी सांगितले.

कारखान्याचा ३२ वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ व गळीत हंगामाचा शुभारंभ आज आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गायकर होते. योगी केशवबाबा व अन्य मान्यवर या वेळी उपस्थित होते.

कारखाना जोपर्यंत आमचे संचालक मंडळाचे ताब्यात आहे, तोपर्यंत कोणत्याही स्थितीत बंद पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही आमदार लहामटे यांनी या वेळी दिली.

या वर्षीचा गळीत हंगाम हा बत्तीस वर्षांतील सर्वांत अडचणीचा आहे. हंगाम सुरू करण्यासाठी चाळीस कोटी रुपयांची गरज होती. बँकेकडून फक्त बारा कोटी रुपये मिळाले. मात्र तालुक्यातील संस्था, कारखान्याशी संबंधित व्यापारी यांच्याकडून मदत मिळाली असे सांगून हा गळीत हंगाम निर्विघ्नपणे पार पडेल, अशी ग्वाही गायकर यांनी दिली.

या वर्षीच्या गळितासाठी तालुक्यात दीड पावणेदोन लाख टन ऊस उपलब्ध आहे. साखर कारखानदारीत स्पर्धा वाढली आहे. अनेक कारखान्यांनी आपली गाळप क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविली आहे. त्यांच्याशी स्पर्धा करायची तर तालुक्यात चार साडेचार लाख टन ऊस निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्याने गतवर्षी २ हजार ८०० रुपये भाव दिला होता. या वर्षी तीन हजार रुपये देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गतवर्षी कारखान्याला केंद्राकडून ९४ कोटी रुपयांचे कर्ज मिळाले. कर्ज मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. कारखाना बंद पडायची ते वाट पहात होते. अशाकडे दुर्लक्ष करा, असा सल्ला देत कारखाना बंद पडू दिला जाणार नाही, असे डॉ. लहामटे यांनी ठामपणे सांगितले.