अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे दीड एकर शेतावरील ज्वारी पिकाचे नुकसान, तसेच बँक व खासगी सावकाराचे डोक्यावर असलेले कर्ज या विवंचनेत परभणी तालुक्यातील नांदगाव येथील नारायण नामदेव काळे (वय ४५) या अल्पभूधारक शेतकऱ्याने दुधना नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला.
जिल्ह्यात २७ फेबुवारी ते १० मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने १ लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकाचे प्रचंड नुकसान झाले. जवळपास २ हजार हेक्टर क्षेत्रावरील फळबागा उद्ध्वस्त झाल्या. रब्बी पिके व फळबागांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे. सरकारकडून काही आर्थिक मदत मिळेल, या अपेक्षेत शेतकरी आहे. परंतु सरकारकडून अजूनही काही मदत मिळत नाही.
नसर्गिक आपत्तीमुळे संकटात आलेल्या नारायण काळे या शेतकऱ्याने दुधना नदीपात्रातील पाण्याच्या डोहात उडी घेऊन मृत्यूला जवळ केले. गेल्या आठ दिवसांपासून काळे तणावाखाली असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. मंगळवारी सकाळी ते कोणालाही काही न सांगता घराबाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने गावकऱ्यांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यात आला. बुधवारी सकाळी गावानजीक दुधना नदीपात्राच्या किनाऱ्यावर काळे यांचे कपडे असल्याचे निदर्शनास आले. नंतर गावकऱ्यांनी त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. त्यांच्या सात-बारावर इंडिया बँकेचे २५ हजार कर्जाची नोंद आहे. तसेच गतवर्षी मुलगी पार्वतीचे लग्न केले. त्यासाठी खासगी सावकाराकडून जवळपास अडीच-तीन लाख रुपये व्याजाने काढले होते. शेतातील ज्वारीचे पीक उद्ध्वस्त झाल्यानंतर बँक व सावकाराचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
देवसिंगा येथील तरुण शेतक ऱ्याची आत्महत्या
वार्ताहर, उस्मानाबाद
शेतातील पिके हातची गेल्याने आर्थिक स्थिती हलाखीची झालेल्या श्रीराम गोिवद देवकर (वय २८) या कर्जबाजारी शेतकऱ्याने मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास स्वतच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा (तुळ) येथे हा प्रकार घडला.
तुळजापूर तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. हातातोंडाशी आलेली पिके मातीत मिसळली. फळबागांसह रब्बी ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर पाणी फेरले गेले. देवसिंगा येथील श्रीराम देवकर यांना एक हेक्टर ३० आर जमीन आहे. आई-वडील, पत्नी व एका मुलाची जबाबदारी त्यांच्यावर होती. स्वतच्या शेतात काबाडकष्ट करून श्रीरामने गहू, ज्वारी व हरभरा ही पिके घेतली होती. देवकर यांच्या शेतातील पीक काढणीस आली होती. परंतु अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे त्यांच्या सर्व पिकांची नासाडी झाली. पिके हातून गेल्याने व उत्पन्नाचा मार्गच न राहिल्याने देवकर खचून गेले होते. त्यांनी या शेतावर तुळजापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेकडून ८० हजार रुपये कर्ज घेतले होते. कुटुंबाचा सांभाळ कसा करायचा व बँकेचे कर्ज कसे फेडायचे, याची चिंता देवकर यांना होती.
शेतातील पीक हातचे गेल्यानंतर सरकारकडून मदत मिळेल, या आशेवर देवकर होते. परंतु सरकारकडून मदत मिळण्यास विलंब होत असल्याने देवकर यांनी मंगळवारी रात्री शेतातील झाडाला दोरीने गळफास घेत मृत्यूला जवळ केले. श्रीरामचे वडील गोिवद देवकर रात्री शेतात झोपायला गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकाराने गावात हळहळ व्यक्त होत आहे. तुळजापूरचे तहसीलदार काशिनाथ पाटील, तलाठी आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पालकमंत्री मधुकर चव्हाण यांनीही दूरध्वनीवर माहिती घेत देवकर कुटुंबीयांचे सांत्वन केल्याचे उपसरपंच साहेबराव जाधव यांनी सांगितले.
बीडमध्येही शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या
वार्ताहर, बीड
गारपिटीच्या नुकसानीने त्रस्त अंबिल वडगाव (तालुका बीड) येथील उद्धवनाना भाऊ तांदळे या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गारपिटीनंतर जिल्हय़ात शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची ही तिसरी घटना आहे.
तांदळे (वय ४२) यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता गळफास घेऊन मृत्यूला जवळ केले. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा आहे. तांदळे यांना ९ एकर शेती असून ज्वारी, गहू, हरभरा, कापूस ही पिके त्यांनी घेतली होती. गारपिटीने हातात आलेले पीक गेल्यामुळे ते दोन दिवसांपासून तणावाखाली होते, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. पीककर्ज, इतर देणी व मुलाच्या शिक्षणाचा खर्च करायचा कोठून या चिंतेत ते होते.
संग्रहित लेख, दिनांक 20th Mar 2014 रोजी प्रकाशित
परभणीत अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे दीड एकर शेतावरील ज्वारी पिकाचे नुकसान, तसेच बँक व खासगी सावकाराचे डोक्यावर असलेले कर्ज या विवंचनेत परभणी तालुक्यातील नांदगाव येथील नारायण नामदेव काळे (वय ४५) या अल्पभूधारक शेतकऱ्याने दुधना नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली.

First published on: 20-03-2014 at 01:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suicide of farmer in parbhani