Sunil Tatkare On Cabinet Ministership : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रावादी काँग्रेस (अजित पवार) एनडीएच्या माध्यमातून लढली होती. राज्यात महायुतीत राष्ट्रवादीच्या वाट्याला अवघ्या ४ जागा आल्या होत्या. त्यापैकी प्रदेशाध्याक्ष सुनील तटकरे यांच्या रुपाने राष्ट्रवादीला रायगडची एकमेव जागा जिंकता आली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी भाजपाने राष्ट्रवादीसमोर राज्यमंत्रिपदाचा (स्वतंत्र कार्यभार) प्रस्ताव ठेवला होता. मात्र, त्यावेळी राष्ट्रवादीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना संधी द्यायची की प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना मंत्रिपद द्यायचे हा प्रश्न पडल्याने राष्ट्रवादीने मंत्रिमंडळा सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती. मात्र, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आता याबाबत स्पष्टीकरण देत राष्ट्रवादी मंत्रिमंडळात का सहभागी झाली नाही याचे स्पष्टीकरण दिले आहे.

राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभेतील एकमेव खासदार असलेले सुनील तटकरे यांनी नुकतीच साम टीव्हीला मुलाखत दिली आहे. त्यांच्या ब्लॅक अँड व्हाईट या कार्यक्रमात त्यांना केंद्रातील मंत्रिपदाबाबत विचारण्यात आले. त्यावर बोलताना सुनील तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, हे मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी होते. त्यांनी संसदेत ३० वर्षांपासून काम केले असल्याने त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळावे अशी त्यांची अपेक्षा होती.

काय म्हणाले सुनील तटकरे?

यावेळी सुनील तटकरे म्हणाले की, “केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपाने मोठ्या मनाने राज्यमंत्रिपद (स्वतंत्र कार्यभार)” देऊ केले होते. मी त्यावेळीही प्रदेशाध्यक्ष होतो आताही आहे. प्रफुल्ल भाई ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचाही ३० वर्षांचा राज्यसभा आणि लोकसभेचा अनुभव आहे. त्यांनी आधी राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) म्हणून काम केले आहे. युपीएच्या शेवटच्या कालखंडात ते त्यांनी कॅबिनेटमंत्री म्हणून काम केले आहे. यावेळी तिथे प्रफुल्ल भाई काम करतील असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमची अपेक्षा आहे की, त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळावी. शेवटी भारतीय जनता पक्षाचे नेतृत्त्व याबाबत निर्णय घेईल.”

हे ही वाचा : राहुल गांधींविरोधात हत्येच्या प्रयत्नाची तक्रार; संसदेत खासदार जखमी झाल्यानंतर भाजपाकडून मोठे पाऊल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची कामगिरी

शरद पवार यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर अजित पवार आणि ४० आमदारांनी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. महायुतीतून राज्यात राष्ट्रवादीला (अजित पवार) ४ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी राष्ट्रवादीला एकच जागा जिंकता आली. राष्ट्रवादीकडून एकमेव सुनील तटकरे रायगडमधून विजयी झाले होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाही बारामतीतून पराभव पत्करावा लागला होता.