अजित पवार यांनी २०१९ मध्ये बंडखोरी करत देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर त्यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये पुन्हा उपमुख्यमंत्री करणे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चूक होती, असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाच्या शिर्डी येथील शिबिरात केले होते. त्यानंतर आता अजित पवार गटाकडून या टीकेला प्रत्युत्तर देण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर उत्तर दिले. “जितेंद्र आव्हाड बेदखल झालेले नेते आहेत. २०१९ साली अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केले नसते तर ते सरकार टिकलेच नसते, हे माझे ठाम मत आहे. तसेच २०१९ साली बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेत शिरगणती न करता गुप्त मतदान झाले असते तर कदाचित पहिल्या दिवशीच सरकार पडले असते. त्यामुळे आव्हाडांचा दावा निखालस खोटा आहे”, असा दावा सुनील तटकरे यांनी केला.

हे वाचा >> ‘साहेब, यांच्या परतीची वाट बंद करा’, अजित पवारांवर टीका करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “गद्दार तो…”

सुनील तटकरे पुढे म्हणाले, “अजित पवार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून संघटनेत जे काही काम केले, त्याचे अनेकवेळा प्रत्यंतर पाहायला मिळाले. त्यांना उपमुख्यमंत्री करणे चूक होते की बरोबर, हे काळाच्या ओघात सिद्ध झालेले आहे. त्याहीपुढे मी जाऊन सांगेन की, अजित पवार विरोधी पक्षनेते झाले, तीदेखील आमदारांचीच इच्छा होती. कारण त्यांचा आमदारांशी थेट संवाद होता. अजित पवारांचे पक्षाने ऐकले नाही, म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील ५३ पैकी ४३ आमदार त्यांच्यापाठी उभे आहेत. झारखंड मधील एक, नागालँडमधील सातही आमदार त्यांच्या पाठिशी आहेत, त्यावरून त्यांची ताकद दिसून येते.”

शिर्डी येथील शिबिरात आव्हाड सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. ते म्हणाले, तटकरे यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याकडे पद होते. त्यांना अजून काय द्यायचे बाकी होते? अजित पवार यांनी तटकरेंच्या मैत्रीखातर मला पालकमंत्री पद न देता त्यांच्या मुलीला पालकमंत्री केले. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी मला बाजूला करून सांगितले होते की, जितेंद्र मला पालघर नको होते, मी रायगड मागितले होते. पण अजित पवार यांनी मित्राला रायगड दिले. त्यामुळे तुला पालघर जिल्हा मिळू शकला नाही.

हे वाचा >> ‘राम बहुजनांचे, ते मांसाहारी..’, जितेंद्र आव्हाड यांचे विधान; म्हणाले, “वेद, मानववंशसास्त्राचा अभ्यास…”

“सुनील तटकरे २०१९ च्या बंडावेळी सिल्व्हर ओकवर होते. पण २०२३ च्या बंडामध्ये अजित पवारांना वेगळ्या मार्गावर घेऊन जाण्यात सर्वात मोठा हात तटकरे यांचा होता. तटकरे यांनी पवारांचे घर फोडले, पण आज त्यांच्या घरात काय होत आहे? त्यांच्या घरात भावा-भावांमध्ये कलह आहे. तुम्ही जे पेराल, तेच उगवेल”, असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डीमधील शिबिरात छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली होती. भुजबळ यांची ढाल केली जात आहे, असे आव्हाड म्हणाले होते. यावर छगन भुजबळांनीही प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “जितेंद्र आव्हाड हे स्वतः ओबीसी समाजाचे आहेत. ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी आजवर एकही शब्द त्यांनी उच्चारलेला नाही. आमची अपेक्षा आहे की, त्यांनी ओबीसींसाठी आवाज उचलला पाहीजे. मला ते बोलका पोपट म्हणाले, पण त्यांना राज्यमंत्री करताना, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देताना मी शरद पवार यांच्याकडे शब्द टाकला. आव्हाडांना मंत्रिपद मिळावे म्हणून त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी माझ्याकडे येऊन विनंती करत होत्या. इतक्या लवकर आव्हाड सर्व विसरून गेले.”

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून आव्हाड यांच्या घराबाहेर निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच महाआरती करून आव्हाड यांचा निषेध नोंदविण्याच्या तयारीत असलेल्या कार्यकर्त्यांना वर्तकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले.