भाजपाकडून लोकसभेतील पराभवाचं अजित पवारांवर फोडण्यात येत असून त्यांना सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट ) आमदार अमोल मिटकरी यांनी केला होता. तसेच अजित पवारांना लक्ष्य केल्यास आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारादेखील त्यांनी भाजपाला दिला होता. दरम्यान, त्यांच्या या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

सुनील तटकरे हे अहमदनगरच्या दौऱ्यावर असून त्यांनी तिथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान त्यांना अमोल मिटकरींच्या विधानांबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, अमोल मिटकरींनी पूर्ण माहिती घेऊनच बोललं पाहिजे, अशा शब्दात मिटकरींचे कान टोचले.

नेमकं काय म्हणाले सुनील तटकरे?

अमोल मिटकरींनी जे विधान केलं आहे. त्याबाबत मी लवकरच त्यांच्याशी चर्चा करेन. त्यांनी एखाद्या विषयावर पूर्ण माहिती घेऊन बोलायला हवं, अशी माझी त्यांना सुचना आहे, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली. तसेच
भारतीय जनता पक्ष अजित पवारांना लक्ष्य करत नसून काही लोक जाणीवपूर्वक अशाप्रकारे बातम्या पसरवण्याचे काम करत आहेत, असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना, आज विदर्भात आणि मराठवड्यात महायुतीला कमी जागा मिळाल्या आहेत. मात्र, ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. तिथे महायुतीच्या उमेदवाराला चांगली मतं मिळाली आहेत. काही लोकांकडून जाणीवपूर्वक अजित पवारांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कमीपणा दाखवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

छगन भुजबळांच्या विधानाबाबत म्हणाले…

दरम्यान, छगन भुजबळांनी काल आपण अजित पवारांबरोबर नसून राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहे, अशा प्रकारचे विधान केलं होतं. यासंदर्भात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेस आमचा पक्ष आहे आणि अजित पवार हे आमच्या पक्षाचे नेते आहेत. छगन भुजबळ हेदेखील आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी जे विधान केलं आहे. त्या विधानाचा संदर्भ समजून घेणं आवश्यक आहे. अनेकदा माध्यमात केवळ एक वाक्यावरून अनेक अर्थ काढले जातात. अजित पवारांच्या नेतृत्वात ते काम करत आहेत, हे त्यांनी यापूर्वी स्पष्ट केलं आहे. पक्षाचे अध्यक्ष हे पक्षाचं नेतृत्व करत असतात, छगन भुजबळ यांनाही ते मान्य आहे, असे ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले होते?

अमोल मिटकरी यांनी काल एक व्हिडीओ शेअर करत भाजपाला इशारा दिला होता. “संघाच्या मुखपत्रात कोणीतरी एक लेख लिहिल्यानंतर सातत्याने अजित पवारांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रात सुरू झाला आहे. भाजपाच्या एका बैठकीतसुद्धा काही नेत्यांनी भाजपाच्या पराभवाचं खापर अजित पवारांवर फोडलं आहे”, असं अमोल मिटकरी म्हणाले होते. तसेच “जर अशाप्रकारे अजित पवारांना जाणीवपूर्क लक्ष्य केलं जात असेल, तर आम्हाला निश्चित वेगळा विचार करावा लागेल”, अशा इशाराही त्यांनी भाजपाला दिला होता.