डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासासंदर्भात पुणे पोलिसांमार्फत प्लँचेटच्या माध्यमातून केल्या गेलेल्या प्रयत्नांच्या आरोपांसंदर्भात अद्याप ठोस कृती शासनाकडून झाली नाही. याबाबत ३१ जुलैपर्यंत चौकशी व तपास पूर्ण न झाल्यास १ ऑगस्टपासून अंनिस राज्यभरात विविध ठिकाणी सनदशीर मार्गाने कृती आंदोलन करेल आणि कायदेशीर कारवाईची सुरुवात करेल, असा इशारा राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकद्वारे दिला आहे.
 डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला २० ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत असताना राज्य शासनाकडून दिशाभूल व त्यामुळे मनस्ताप झाला आहे. खुनाच्या घटनेची वेदना आणि दु:ख अनुभवत असताना अंनिसच्या कार्यकर्त्यांकडून तपासाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. तेही कमी म्हणून त्यांच्या खुनाचा तपास प्लँचेटचा वापर करून केल्याचे प्रसिद्धिमाध्यमांकडून आरोप केला आहे. अंनिसने याबाबत तपास व्हावा आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करावा असे म्हटले होते. तसेच पुण्याचे अतिरिक्त सहायक आयुक्त संजूकुमार यांच्याकडे तक्रार निवेदन कार्यकर्त्यांनी दिले होते. तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांना भेटून लक्ष घालण्याची विनंती केली होती, मात्र राज्य शासनाने अद्याप ठोस भूमिका स्पष्ट केली नाही. आता तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्र्यांनी मौन सोडावे असे पत्रकात म्हटले आहे.
डॉक्टरांच्या समाजाला डोळस करण्याचे कार्य अंधश्रद्धाविरोधी होते.त्यांच्या खुनाचा शोध घेण्याचे सोडून पोलिसांचा उघडकीस आलेला हा अघोरी प्रकार जखमेवर मीठ चोळणारा आहे, अशी भावना अंनिसचे कार्यकत्रे आणि दाभोलकर कुटुंबीयांची आहे. ज्या अंधश्रद्धेच्या विरोधात समाजाचे प्रबोधन करण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न केले त्या डॉक्टरांच्या खुनाचा शोध घेण्यासाठी अंधश्रद्धा पसरवणाऱ्या काही कर्मकांडाचा पोलीस यंत्रणेने वापर करावा हे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे असे पत्रकात म्हटले आहे.