परभणी : सरकारने मला न्याय दिला नाही पण सर्वोच्च न्यायालयाने तो दिला. आता कोणतीही दिशाभूल करू नका आणि फाटे फोडू नका. माझ्या लेकराचा ज्यांनी जीव घेतला त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. सरकार एवढ्या सगळ्या महिलांना लाडकी बहीण मानते मग मी सरकारची लाडकी बहीण नाही का ? असा प्रश्न सोमनाथ सूर्यवंशीच्या आई विजयाबाई यांनी उपस्थित केला आहे.
राज्य सरकारचे अपील फेटाळत सोमनाथ सूर्यवंशी मृत्युप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर सोमनाथची आई विजयाबाई यांनी ‘लोकसत्ता’ला प्रतिक्रिया दिली.
दिनांक १० डिसेंबर २०२४ या दिवशी परभणीत संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान पोलिसांनी काही महिला व तरुणांना अटक केली. त्यात सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा समावेश होता. न्यायालयीन कोठडीत सोमनाथचा मृत्यू झाल्यानंतर आपल्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विजयाबाई सूर्यवंशी यांनी सातत्याने लावून धरली. या प्रकरणात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उच्च न्यायालयात बाजू लढवली. दिनांक ४ जुलैला उच्च न्यायालयाने या प्रकरणात आठ दिवसांच्या आत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यावर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले.
विजयाबाई म्हणाल्या, ज्याने संविधानाची विटंबना केली त्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायचे सोडून सरकार आमच्यावरच अन्याय करू लागले आहे. आमच्या आधीच्या पिढ्यांपासून सरकार हे मायबाप असते, असे मी ऐकत आले. पण हे सरकार आमच्यासाठी वैरी झाले. आता विश्वास कोणावर ठेवायचा ? उच्च न्यायालयाने आठ दिवसांच्या आत गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता, त्याला येत्या सोमवारी (दि.४) एक महिना होईल. आता तरी फाटे फोडू नका, असे त्या म्हणाल्या.
माझं लेकरू कायद्याचा अभ्यास करत होतं. निर्व्यसनी होतं. त्याला सलग चार दिवस कोठडीत बेदम मारहाण झाली. जर त्याच्या जागेवर एखाद्या मंत्री, आमदार, खासदाराचे लेकरू असतं तर सरकार असंच वागलं असतं का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या लढाईत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी मनोमन आभार मानले. त्यांच्यामुळेच हे प्रकरण लावून धरले गेले, असे त्या म्हणाल्या. मला सर्वोच्च न्यायालयामुळे न्याय मिळाला. आता तरी सरकारने दिशाभूल करू नये. आठ महिन्यांपासून मी भांडत आहे. गुन्हा दाखल होईपर्यंत मला समाधान मिळणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.