दिल्ली पोलिसांनी मंगळवारी ‘न्यूजक्लिक’शी संबंधित पत्रकारांवर आणि वेगवेगळ्या ३० ठिकाणांवर छापेमारी केली. दिवसभर त्यांची चौकशी केली आणि दिवसअखेरीस संस्थापक प्रबीर पूरकायस्थ आणि मनुष्यबळ विभागाचे प्रमुख अमित चक्रवर्ती यांना अटक केली. ‘न्यूजक्लिक’ वृत्त संकेतस्थळावर चीनकडून निधी घेऊन त्या देशाच्या बाजूने प्रचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, पत्रकारांवरील धाडी, वृत्तसंस्थांच्या कार्यालयांवरील छापेमारीवरून खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या आहेत. या कारवाईवरून सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदी सरकारला देशात आणीबाणी लावली आहे का? असा प्रश्न विचारला आहे.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, आपल्या राज्यातली शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे. सोयाबीन, कपाशी पिकांचं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर पिकाला हमीभाव नाही. राज्य सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. हे लोक केवळ खासगी विमानाने दिल्ली दौरे करण्यात व्यस्त आहेत. केवळ आपलं सरकार वाचलं पाहिजे याचीच त्यांना काळजी आहे. २०० आमदार असले तरी त्यांना केवळ सरकार टिकवण्याची काळजी आहे. मी विरोधक म्हणून बोलत नाही. परंतु, कोणीतरी खरं बोललं पाहिजे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, देशात जो खरं बोलेल त्याच्यामागे आईस (ICE – Income Tax, CBI, ED) आहे. आम्ही गेल्या काही वर्षांपासून हेच म्हणतोय. आता सर्वोच्च न्यायालयानेही तेच म्हटलं आहे. जो खरं बोलेल त्याच्यामागे इन्कम टॅक्स (आयकर विभाग), सीबीआय (गुन्हे अन्वेशन विभाग) आणि ईडीचा (अंमलबजावणी संचालनालय) ससेमिरा आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की, सरकारने या आईसचा वापर कमी करावा. ईडी, सीबीआय आणि आयटीचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात असल्याचा आरोप सर्वोच्च न्यायालयाने केला आहे.

हे ही वाचा >> “भाजपाच्या मेहरबानीने पालकमंत्री…”, हसन मुश्रीफांना भाजपा नेत्याचा टोला; म्हणाले, “कोल्हापुरात संघर्ष अटळ”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, कालच देशात पत्रकारांवर छापेमारी करण्यात आली. त्या पत्रकारांची काय चूक होती? प्रत्येक वर्तमानपत्र म्हणतंय की काहीच पुरावे मिळाले नाहीत. परंतु, जो विरोधात बोलेल त्याच्याविरोधात खटला भरवला जाईल. आयटीची नोटीस पाठवली जाईल. आधी बीबीसी आणि आता न्यूजक्लिकवर कारवाई करण्यात आली आहे. ही आणीबाणी आहे का? इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली होती. परंतु, त्या म्हणाल्या तरी होत्या की, आणीबाणी लागू करत आहोत. परंतु, आता देशात सगळेच घाबरत आहेत. देशात खूप संघर्षाचा काळ सुरू आहे.