जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवारांसह काही आमदार आणि खासदारांनी महायुतीच्या सरकारला पाठिंबा दिला. यानंतर आमदारांना अपात्र करण्यासाठी राष्ट्रवादीकडून विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. तर, खासदार सुनील तटकरे यांना अपात्र करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे चार महिन्यांपूर्वी याचिका दाखल केली होती. पण, कुठलीही कारवाई न झाल्यानं सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त केली आहे.

सुप्रिया सुळेंची मागणी काय?

सुप्रिया सुळेंनी ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. दहाव्या परिशिष्टानुसार सुनील तटकरे यांना अपात्र करण्यासाठी ४ जुलैला याचिका दाखल केली होती. मात्र, चार महिन्यांपासून अद्याप कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी लोकसभेच्या अध्यक्षांकडे केली आहे.

“…तर अध्यक्षांच्या नियमांनुसार कारवाई झाली पाहिजे”

याबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पक्ष ही आपली आई असते. आपल्या आईबरोबर गैरव्यवहार कुठल्याच संस्कृतीत मान्य नाही. त्यामुळे पक्षाबरोबर कुणीतरी चुकीचा व्यवहार करत असेल, तर अध्यक्षांच्या नियमांनुसार कारवाई झाली पाहिजे.”

“अदृश्य शक्तीच्या जीवावर सर्व चालू आहे”

चार महिने कारवाई न होण्यामागाचं कारण काय? असा प्रश्न विचारल्यावर सुप्रिया सुळेंनी म्हटलं, “दिल्लीत अदृश्य शक्ती आहे. ज्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनीही केला आहे. दिल्लीतील अदृश्य शक्तीच्या जीवावर सर्व चालू आहे. अदृश्य शक्ती नसती, तर हा खेळ चालला नसता.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी कधीही खोटे आरोप करत नाही”

“ही अदृश्य शक्ती महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण खच्चीकरण करण्याचं काम करत आहे. अदृश्य शक्ती महाराष्ट्राविरोधात दिल्लीतून कटकारस्थानं रचते. मी कधीही खोटे आरोप करत नाही,” असेही सुप्रिया सुळेंनी सांगितलं.