Supriya Sule on Eknath Shinde : राज्यात महायुतीला निर्विवाद यश मिळल्यानंतर लवकरात लवकर सत्ता स्थापन होईल, अशी चिन्हे होती. परंतु, अद्यापही मुख्यमंत्री पदाचा पेच सुटला नसल्याने राज्यात कोणांचही सरकार स्थापन झालेलं नाही. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वामुळेच महायुतीचा विजय झाला असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्या काल (२६ नोव्हेंबर) माध्यमांशी बोलत होत्या.

मुख्यमंत्री न ठरणं हे लॉजिकच्या बाहेरचं आहे

“मला आश्चर्य वाटत नाही. एवढं मोठं बहुमत मिळाल्यानंतर दुधाच्या भावात तीन रुपयांनी कपात केली. हे तीन रुपये शेतकऱ्यांना मिळणार होते. ज्यांनी विश्वासाच्या नात्यावर मतदान केलं त्यांच्यावर त्यांनी पहिला घणाघात गरीब शेतकऱ्यांचा केला. महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यात मोठ्या समस्या असतानाही मुख्यमंत्र्यांचा निर्णय घेतला जात नाहीय. हे लॉजिकच्या बाहेरचं आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा >> Supriya Sule : बहुमतानंतरही मुख्यमंत्री पदाचा पेच कायम; २०१९ चा उल्लेख करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “उद्धव ठाकरे..”

कमिटमेंटचा विषय आताही

एकनाथ शिंदेंना कोणताही शब्द दिला नव्हता असं महायुतीचे नेते म्हणत आहेत, यावर सुप्रिया सुळेंना विचारलं असता, त्या म्हणाल्या, “तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. कोणी कोणाला शब्द दिला, कोणी फिरवला. कारण २०१९ मध्ये उद्धवजी हेच सांगत होते. २०१९ मध्ये जसा कमिटमेंटचा विषय झाला तसाच २०२४ मध्ये झालाय. हे फार रंजक आहे.”

शिंदेंचा चेहरा घेऊन महायुती लढली

“२०१९ मध्ये हेच वारंवार सांगत होते. त्यांची युती तुटली ती यावरूनच तुटली. आता तीच परिस्थिती पुन्हा झालीय. शेवटी शिंदेंच्या चेहऱ्यांवरून झालं. तो शिंदेंचा करिष्मा होता हे सर्वांनी मान्यच करावं लागेल. एका सशक्त लोकशाहीत आम्हाला मान्य करावंच लागेल शिंदेंचा चेहरा घेऊन महायुती उभी राहिली आणि त्यांना यश मिळालं. ते नेते, मुख्यमंत्री आणि त्यांनी केलेले कष्ट मान्य करावं लागेल”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, काल दिलेल्या प्रतिक्रियेत रावसाहेब दानवेही म्हणाले की आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखााली निवडणूक लढवली. हे खरं असलं तरीही अडीच अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाबाबत कोणतंही बोलणं झालं नव्हतं. दोन्हींकडून अशी कोणतीही आश्वासनं देण्यात आली नव्हती.

मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीसांकडे

बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही तोच पॅटर्न राबवून शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करावे, यासाठी शिवसेनेकडून दबावतंत्र वापरण्यात आले. मात्र भाजपाने १३२ आणि पाच अपक्ष आमदारांचे समर्थन मिळविल्यामुळे त्यांनी या दबावाला फारसे महत्त्व दिले नाही. तसेच शिवसेनेच्या काही नेत्यांकडून महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबविण्याची मागणी केली जात होती, त्यालाही भाजपाने फेटाळून लावले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपद हे भाजपाकडेच राहिल, हे आता जवळपास निश्चित झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

o