मंगळवारी बारामतीतील सभेत बोलताना आजपर्यंत शरद पवार आणि त्यांच्या मुलीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना मतदान करून विजयी करा, असं आवाहन अजित पवार यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सुधीर मुनंगटीवारांच्या विधानापासून ते राज्यातील पाणी टंचाईपर्यंत विविध मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. यावेळी पत्रकारांनी त्यांना अजित पवारांनी बारामतीकरांना केलेल्या आवाहनाबाबत विचारण्यात आलं, यावर उत्तर देताना लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

दरम्यान, विजय शिवतारे यांनी उमेदवारी माग घेऊ नये, यासाठी त्यांना शरद पवार गटाच्या नेत्यांकडून फोन करण्यात आले होते, असा गौप्यस्फोटही अजित पवार यांनी मंगळवारच्या सभेत केला होता. यासंदर्भातही विचारलं असता, “मला या प्रकरणाची माहिती नाही, जर आमच्या पक्षातील नेत्यांनी असे कॉल केले असतील, तर तो नेते कोण आहेत, हे जाणून घ्यायला मलाही आवडेल”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा – “ट्रिपल इंजिनचे खोके सरकार असंवेदनशील, त्यांना…”; राज्यातील पाणी टंचाईवरून सुप्रिया सुळेंची शिंदे सरकारवर टीका!

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

बारामतीतील सभेत बोलताना अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना या निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले होते. “तुम्ही आधी साहेबांना मतदान केलं, त्यानंतर मुलाला म्हणजेच मला मतदान केलं. नंतर मुलीला मतदान केलं. आता सुनेला मतदान करा म्हणजे तुम्हाला पवारांना मतदान केल्याचं समाधान मिळेल”, असे अजित पवार म्हणाले होते.

“मी राजकारणाची सुरुवात केली तेव्हा तिशीत होतो. आता साठी पार केली आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची आहे. महायुतीचा उमेदवार कोण द्यायाचा याचा विचार केला. सुनेत्रा पवारांचं नाव पुढे आलं. आता कुणाला मतदान करायचं हा प्रश्न लोकांना पडला. त्यामुळे मी सांगतो पवार दिसेल त्या ठिकाणीच मतदान करा”, अशी प्रतिक्रियाही अजित पवारांनी दिली होती.

हेही वाचा – “तंबाखूच्या पुडीवर ‘आरोग्यास हानिकारक’ असं..”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्याव…

शिवाय ज्यावेळी विजय शिवतारे यांनी बारामतीतून उभं राहण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शरद पवार गटाच्या नेत्यांनी त्यांना फोन केले होते, असा गौप्यस्फोटही अजित पवार यांनी केला होता. “मला शिवतारेनी फोन कॉल रेकॉर्ड दाखवले, ते कॉल माझ्या जवळच्या व्यक्तीने केले होते. राजकारण आता अतिशय खालच्या पातळीवर गेलं आहे”, असे ते म्हणाले होते.