पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात जीएसटी रिफॉर्म्सबाबत घोषणा केली होती. त्यानंतर जीएसटी परिषदेच्या बैठकांचं सत्र पार पडलं. यानंतर सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला. ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टॅक्स स्लॅब ठेवून इतर सगळ्या टॅक्स स्लॅबमधून नागरिकांना दिलासा देण्यात आला. दरम्यान तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, सट्टा, ऑनलाइन गेमिंग अशा सीन गुड्सवर ४० टक्के जीएसटी असेल असंही सरकारने जाहीर केलं. तसंच २२ सप्टेंबर म्हणजेच आजपासूनच कर कपातीचा निर्णय लागू केला. एकीकडे या निर्णयावरुन सरकारचं कौतुक होतं आहे. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र हे सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असं म्हटलं आहे. शिवाय लाडकी बहीण योजनेवरुन त्यांनी महाराष्ट्र सरकारवरही टीका केली आहे.

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

महाराष्ट्रात जे काही चाललं आहे त्याबद्दल काय बोलायचं? मला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हाचं त्यांचं भाषण आठवतं आहे. मै प्रधानसेवक हूँ असं म्हणाले होते. महाराष्ट्रातलं सरकार नरेंद्र मोदी यांचंही ऐकत नाही असंच मला आता जे घडतं आहे ते पाहून वाटतं आहे.

लाडकी बहीण योजनेबाबत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

लाडकी बहीण योजनेत ४ हजार ९०० कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. पैसे गेले कुठे? सरकार सांगतं अनेक पुरुषांनी लाभ घेतला. कुठल्या पुरुषांना लाभ मिळाला? ते सरकारने सांगितलेलं नाही. सरकारी डेटाच सगळं सांगतो आहे. शिवाय ज्या बहिणींना वगळलं त्यांना आधी समाविष्टच का केलं होतं? तेव्हा समजलं नाही का की या बहिणी अपात्र आहेत? सरकारने उत्तर दिलं पाहिजे.

जीएसटी उत्सव साजराच करावा लागला नसता जर पाच वर्षांपूर्वी…

जीएसटीचा उत्सव साजरा करा असं पंतप्रधान सांगत आहेत. पण पाच वर्षांपूर्वीच जर हा निर्णय घेतला असता तर या उत्सवाची गरजच पडली नसती. कारण आता जे काही उत्सव वगैरे साजरा करतो आहोत ते ठीक आहे. पण मागची पाच वर्षे पी. चिदंबरम यांनी सांगितलं आहे की जीएसटीचे वेगवेगळे दर चुकीचे आहेत. पाच स्लॅब करु नका सांगितलं होतं. वन टॅक्स वन नेशन असंच असलं पाहिजे. १२, १८, १६ टक्के. पॉपकॉर्न, सॉल्टेड पॉपकॉर्न किती सगळं विचित्र होतं. सरकारने उशिरा निर्णय घेतला पण आम्ही त्यांचं स्वागत करतो आहोत. तरीही हे वाटतंच की पाच वर्षांपूर्वी निर्णय घ्यायला हवा होता. असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.