नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात झालेल्या मृत्यूतांडवाप्रकरणी राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळेही चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. संभाव्य प्रकार थांबवण्याकरता सुप्रिया सुळे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. औषधपुरवठ्यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनाही विनंती केली आहे. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी X वरून दोन पोस्ट्स केल्या आहेत.
X वर केलेल्या पहिल्या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात की, राज्यातील ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय रुग्णालयांत रुग्णांचे औषधे आणि तत्पर सेवेच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. या सर्व घटना महाराष्ट्र राज्याच्या लौकिकाला शोभणाऱ्या नाहीत. केवळ शासनाचा नाकर्तेपणा आणि दुर्लक्षामुळे हे मृत्यू घडून आले. विद्यमान सरकारचा आरोग्यसेवेकडे पाहण्याचा दृष्टिकोन लक्षात आल्यामुळे मी बारामती लोकसभा मतदारसंघातील आरोग्य सेवांचे हेल्थ ऑडीट करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रे येथे प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेणार आहे. तसेच जिल्हाधिकारी पुणे आणि पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी देखील आरोग्य सुविधांचा नियमितपणे आढावा घ्यावा. रुग्णांच्या उत्तम व सजग आरोग्य सुविधांसाठी हे गरजेचे आहे.
दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी लोकसत्तात छापून आलेल्या वृत्ताचा हवाला देत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. “पुणे जिल्हा आणि परिसरातील नागरिकांसाठी अतिशय सोयीचे आणि महत्वाचे हॉस्पिटल ससून येथे गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अडचणी असल्याचे आढळून आले आहे. ससूनकडून औषधे खरेदीसाठी हाफकिन या संस्थेला सहा कोटी देण्यात आले.परंतु अद्यापही औषधपुरवठा करण्यात आला नाही.याखेरीज येथे मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत.यामुळे रूग्णसेवेत अडथळे निर्माण होत आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री आणि जिल्हाधिकारी, पुणे यांनी यात तातडीने लक्ष घालून आवश्यक ती कार्यवाही करावी”, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, राज्यातील आरोग्यसेवा सलाईनवर गेल्याची प्रतिक्रिया अनेक विरोधकांकडून करण्यात येत आहे. या मृत्यूप्रकरणी सरकारकडून चौकशी केली जाणार असून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहे.